मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव

रोहित-विराटसह आघाडीची नामुष्की उठली मुळावर

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-30 13:07:29

मेलबर्न :- मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत २-१ अशी महत्वाची आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना ३ जानेवारीपासून सिडनीत  खेळवला जाणार आहे. भारताला जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर सिडनी कसोटी काहीही करुन जिंकावी लागणार आहे.   

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव केवळ १५५ धावांवरच आटोपला. भारताच्या ७ फलंदाजांनी तासाभरात आपल्या बेजबाबदारपणाचे प्रदर्शन करत कांगारुंचा विजय सोपा करुन टाकला.  ३०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना भारताला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही कसोटी क्रिकेटमधील ४९वी वेळ आहे.      

चौथ्या दिवशी ९ गडी गमावून ३३३ धावांची आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने ५व्या दिवशी आपल्या धावसंख्येत आणखी ६ धावांची भर घातली आणि भारताला ३४०धावांचे लक्ष्य दिले.  भारताने पहिल्या सत्रातच महत्वाचे ३ फलंदाज ३३ धावांतच गमावल्यामुळे उर्वरित खेळाडूंवर दबाव कायम राहिला.  यानंतर ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल यांनी ही पडझड रोखत धावसंख्या ११२ वर पोहोचवली. या जोडीने सामना ड्रॉ करण्याच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र त्यानंतर तिसऱ्या सत्रात पहिल्या तासातच कांगारुंनी भारताचे तब्बल ७ फलंदाज केवळ ४३ धावात तंबूत धाडल्याने मानहानीकारक पराभव भारताला स्वीकारावा लागला. जैस्वालने ८२ धावांची महत्वाची खेळी केली.  शॉर्ट चेंडूवर फटका खेळण्याच्या नादात तो बाद झाला, पण तिसऱ्या पंचांनी स्निकोमीटरवर हालचाल नसतानाही त्याला बाद घोषित केले होते. यानंतर आकाशदीपच्या झेलबाद बाबतही अशीच चर्चा रंगली.   

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी सामन्यात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी  कांगारुंपुढे सपशेल शरणागती पत्करल्यामुळे भारताला पराभवाची चव चाखावी लागली आहे.  भारतीय संघ हा कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यासाठी धडपड करेल असे वाटत होते, पण भारताच्या फलंदाजांनी  केलेली हाराकिरी संघाला महागात पडली आहे.