रोहित शर्माने निवृत्ती जाहीर करावी

रवी शास्त्रीसह ज्येष्ठ खेळाडूंची अपेक्षा

Written by लोकनामा ऑनलाईन क्रीडा 2024-12-30 13:25:22

मेलबर्न :-  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कर्णधार , हिटमॅन रोहित शर्मा याने आतापर्यंत केवळ ३, ६, १०, ३ आणि ९ अशा धावा केल्या आहेत. दोन आकडी धावसंख्या गाठणे देखील रोहितला जड जात असेल आणि त्याची धावांची भूक संपली असेल, कर्णधार म्हणून जिंकण्याची भूक संपली असेल तर रोहितने आता निवृत्तीबाबत ताबडतोब निर्णय घेण्याची वेळ आली आहे असे मत क्रिकेट जगतात व्यक्त होत आहे. मेलबर्न कसोटी गमावल्यानंतर रोहितने स्वत:हून निवृत्ती जाहीर करण्याची अपेक्षा रवी शास्त्री  यांच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनी व्यक्त केली आहे. 

गेल्या १५ कसोटी डावांमध्ये रोहितने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे.  रोहितचे वय सध्या ३७ वर्षे आहे, त्याचे वाढलेले वजन, गमावलेला फिटनेस तसेच त्याचा ढासळत चाललेला आत्मविश्वास हे सर्व लक्षात घेता  रोहित आता काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर तो शेवटचा सिडनी कसोटी सामना खेळला तर त्यानंतरही तो निवृत्तीची घोषणा करू शकतो.  

मेलबर्न कसोटी गमावल्यानंतर रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्ती संदर्भात बोलताना सांगितले, की   माझ्या मते विराट कोहली आणखी काही काळ खेळताना दिसेल. तो आज कसा बाद झाला, याने काही फरक पडत नाही. माझ्या मते तो पुढील तीन-चार वर्षे खेळताना दिसेल. रोहित शर्मा बद्दल बोलायचं तर, तो निर्णय घेऊ शकतो. टॉप ऑर्डरमध्ये त्याचं फूटवर्क आता पूर्वीसारखे राहिलेलं नाही. चेंडूपर्यंत पोहोचण्यात त्याला विलंब होतोय. त्यामुळे या मालिकेत काय करायचं हा सर्वस्वी त्याचा निर्णय असणार आहे.”  

मेलबर्न कसोटीतही संघ अडचणीत असताना, या सामन्याचे महत्व माहित असताना रोहित-विराटने सपशेल निराशा केली. त्यामुळे नेटिझन्स देखील या दोघांनी आता निवृत्त व्हावे असा संताप व्यक्त करीत आहेत.