नववर्ष स्वागतासाठी हॉटेले, उपाहारगृहे सज्ज

अनेकांकडून आगाऊ बुकिंग; पर्यटकांची कोकण, गोव्याला पसंती

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-30 13:49:35

लोकनामा प्रतिनिधी 
नाशिक: काही वर्षांपासून नववर्षाचे स्वागत नाशिकमध्येही विविध उपक्रमांनी होत आहे. तरुणाईसह अनेक नाशिककर नववर्षाचे स्वागत हॉटेल्समध्ये मित्रकंपनी व परिवारासोबत करतात. त्यामुळे यंदाही नववर्षाच्या स्वागतासाठी शहर व परिसरातील छोटे-मोठे हॉटेल्स, उपाहारगृहे, रिसॉर्ट सज्ज झाले आहेत. पर्यटकांकडून कोकण, गोव्याला पसंती मिळाली आहे. काही जण आधीच तेथे पोहोचले आहेत. 
              येत्या ३१ डिसेंबरला मध्यरात्री १२ चा ठोका पडताच रंगीबेरंगी आतषबाजीही केली जाणार आहे. काही हॉटेल्समध्ये नवीन वर्षासाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. त्यासाठी गीत, संगीत, नृत्याचे कार्यक्रम, तसेच मोठे स्क्रीन लावण्यात आले आहेत. 
            नववर्ष स्वागतासाठी नाशिककरांनी विविध प्लॅन केले आहेत. तरुणाई शहराजवळील पर्यटनस्थळे, रिसॉर्ट येथे मेजवानीचा बेत आखत आहे. अनेक जण आपल्या परिवारातील सदस्यांसह शहरातील हॉटेलमध्ये नवीन वर्षाचे स्वागत करणार आहेत. 
            नाशिककरांचा नववर्ष स्वागताचा उत्साह 'कॅश' करण्यासाठी शहर व परिसरातील हॉटेले, उपाहारगृहे सज्ज आहेत. हॉटेलांवर रोषणाई केली आहे. पारंपरिक भोजनासह अनेक हॉटेलमध्ये खास नववर्षाच्या स्वागतासाठी नवीन व वैविध्यपूर्ण मेन्यू, पदार्थांची रेलचेल असेल. परिवारासह हॉटेलमधील जेवणाचा आनंद घेता यावा यासाठी काही हॉटेलमध्ये कुटुंबासाठी खास स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मुलांसाठी खास गेमचे आयोजन काही हॉटेलांत करण्यात आले आहे.

नववर्षाला देवदर्शनासाठी गर्दी 

एक जानेवारी २०२५ पासून पुढे चार ते पाच दिवस देवदर्शनासाठी गर्दी असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात भाविकांची मोठी मांदियाळी दिसणार आहे. परिणामी मंदिर परिसरातील विक्रेत्यांची आर्थिक उलाढाल वाढेल. साहजिकच आर्थिक चक्राला गती मिळेल.