नववर्षाच्या स्वागतासाठी धार्मिक पर्यटनाला पसंती

राज्यभरातील देवस्थाने भाविकांच्या गर्दीने फुलली

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-30 14:53:19

मुंबई :- नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र सज्जता होत असून उत्साहाचे वातावरण आहे. नवीन वर्ष सुख-समृद्धीचे जावो यासाठी देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करण्याचा अनेक जण संकल्प करतात. त्यासाठीच राज्यातील सर्वच प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी वाढली आहे. प्रामुख्याने शिर्डी, तुळजापूर, सप्तश्रुंगी देवी, शेगाव, त्र्यंबकेश्वर येथे नागरिकांची तोबा गर्दी दिसून येत असून मंदिर परिसर गजबजून गेला आहे.  नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या काळात पर्यटक धार्मिक स्थळांना पसंती देत आहेत.

       महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. महाराष्ट्रासह तेलंगणा, कर्नाटकमधून भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत.  भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अक्कलकोट येथेही स्वामी समर्थांच्या चरणी लीन होण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. मुंबई, पुण्याहून मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोट इथे दाखल झाले आहेत. शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी देखील राज्यासह मध्यप्रदेश,   गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा या राज्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.   शेगाव संस्थाननेही मंदिर चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीत खंडेरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. 

श्री भगवतीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले

लोकनामा प्रतिनिधी
सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे नाताळ सुट्ट्या, वर्ष समाप्ती व नूतन वर्ष प्रारंभ या काळात भाविक श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी सप्तशृंगगडावर येतात. त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी श्रीभगवतीचे मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले राहील, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली.
वर्षाच्या शेवटी व सुरुवातीला राज्यासह परराज्यांतून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यांना गर्दीविरहित सुलभ दर्शन व्हावे यादृष्टीने विश्वस्त मंडळ व प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार श्रीभगवती मंदिर २९ डिसेंबरपासून २ जानेवारी २०२५ ला रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्यात येणार आहे. या काळात घाटरस्ता व सेवा-सुविधा पूर्ववत असतील, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन   विश्वस्त व कार्यालयीन प्रशासनाने केले आहे.

 नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथेही त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरापासून एक ते दीड किलोमीटर पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दर्शनासाठी पर्यटकांना तीन ते चार तासांचा वेळ लागतोय.