मालेगाव मनपा म्हणजे ‘अंधेर नगरी..’
दोन दिवसांआड पुरवठ्याच्या घोषणेनंतर, चक्क चौथ्या दिवशी नळांना पाणी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-30 15:13:25

मालेगाव : येथील महानगरपालिकेने मुबलक पाणीसाठा असतांनादेखील, शहरवासीयांना दिवसाआडऐवजी पुन्हा दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केल्याने नागरिकांतून विशेषत: महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर शहरातील काही भागांत मात्र चौथ्या दिवशी नळांना पाणी येत असल्याने महापालिकेचा कारभार म्हणजे ‘अंधेर नगरी …’ असल्याचे नळधारकांतून बोलले जात आहे.
महापालिका पाणीपुरवठा विभागाने २३ डिसेंबरला भीमगर्जना करत शहरात २६ डिसेंबरपासून दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे घोषित केले होते. घोषणेनुसार मनपाच्या प्रसिद्धी पत्रकात २६ तारखेला पाणीपुरवठा करण्यात येणारे झोनदेखील निश्चित करून जाहीर केले होते. परंतु संबंधित मनपा अधिकाऱ्यांनी ही घोषणा करण्यापूर्वी किमान शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन तपासण्याची गरज होती. त्याचा अभ्यास करून मग उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करणे अपेक्षित होते. मात्र पत्रकानुसार असे काही केले नसल्याचे उघड झाले आहे.
कारण २६ डिसेंबरच्या घोषित केलेल्या १२ झोनपैकी अनेक ठिकाणी एक दिवस आधीच म्हणजे २५ डिसेंबरला पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे २६ ला पाणी येणार नाही या कल्पनेने काही जण झोपेतून उठलेच नाहीत आणि अपेक्षेप्रमाणे नळांना ही पाणी आलेच नाही. त्यामुळे मनपाच्या दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या घोषणेनुसार तिसऱ्या दिवशी म्हणजे २८ डिसेंबरला या भागात पाणीपुरवठा होणे अपेक्षित होते. त्यामुळे नळांना पाणी येणार आणि पहाटे धावपळ नको म्हणून अनेकांनी रात्री झोपी जाण्यापूर्वी घरातील पिण्याचे पाणी भरण्याचे भांडे स्वच्छ धुऊन ठेवले. मात्र मनपाच्या परंपरागत पायंड्यानुसार शनिवारी (ता. २८) नळांना पाणी आलेच नाही.
दुसरीकडे मनपाकडून रात्री उशिरापर्यंत पाणीपुरवठा होत असल्याने व सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याचे पत्रकात नमूद केले होते. त्यामुळे दिवसा पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती भंग झाली हा भाग वेगळा. शहरातील जवळपास सर्वच जलकुंभांवरून झोनप्रमाणे पहाटे पाणी पुरविले जाते. त्यामुळे मनपाच्या शिरस्त्याप्रमाणे या बारा झोनच्या जलकुंभांवरून पहाटे पाणी येणाऱ्या भागातील अनेक कुटुंबे पहाटे पाणी भरण्यासाठी उठले तर नळांना पाणी नव्हते. त्यामुळे आत्ताच पाणी येईल, तेव्हाच येईल या आशेने त्यांना संपूर्ण दिवसभर चातक पक्ष्याप्रमाणे पाण्याची वाट पाहण्याची वेळ आली. घरातील पाणीही संपवले व मनपाने पाणी पुरविले नाही. त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी या म्हणीनुसार अनेकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली.
दिवसभर वाट पाहूनही नळांना मात्र पाणी आलेच नाही. याविषयी विचारणा केली असता कोणीही माहिती दिली नाही. त्यामुळे रविवारी (ता. २९) पहाटेपासून पुन्हा पाण्यासाठी त्यांना जागे राहावे लागले. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. पाण्याच्या चिंतेत तब्बल दोन रात्री अन् दोन दिवस घालवल्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे पाणी आल्यावर नागरिकांना विशेषतः गृहिणींचा जीव भांड्यात पडला.
वास्तविक, गेल्यावर्षी धरणे कोरडीठाक झाल्याने दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. ऑगस्ट २०२३ पासून सुरू झालेला हा दोन दिवसांआडचा पाणीपुरवठा दिवाळीसारख्या सणादरम्यानसुद्धा सुरूच होता. वास्तविक ऑगस्ट २०२४ अखेर तालुक्यासह कसमादेतील धरणे मुबलक पावसामुले ओसांडून वाहत आहेत. सध्या कसमादेतील नद्या-नाले दुथडी वाहत असून, धरणात पाणी साठवायला जागा नाही. असे असतांना मनपा प्रशासनाने नागरिकांच्या नव्हे, तर आमदारांच्या मागणीला मान देत ४ डिसेंबरपासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यातही दोन ते तीन वेळा विविध कारणांनी शहराचा पाण पुरवठा बंद झाला होता. म्हणजे फक्त २० दिवस तेही दिवसाआड पाणी पुरवल्यानंतर मनपाने अचानक पुन्हा दोन दिवसाआड पाणी पुरवठ्यास सुरुवात केली आहे. त्याबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून, सर्वसामान्य मालेगावकरांना कोणी वालीच नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.