यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजराने जेजुरी दुमदुमली
सोमवती अमावस्येनिमित्त गडावर विशेष यात्रा
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2024-12-30 16:08:20
मेजुरी:- सलग सुट्यांचा योग साधत खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून लाखो भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा उत्सव साजरा होत असतो. या यात्रेनिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीपासूनच जेजुरी रोषणाईत आणि भंडाऱ्यात न्हाऊन निघाली आहे.
सोमवती अमावस्या उत्सवानिमित्त जेजुरी गडावरून देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी काढण्यात आली. साडेपाच वाजता पालखी कऱ्हा नदी पात्रात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत कऱ्हा नदीवर पालखीतील खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्तीना विधीयुक्त स्नान घालण्यात येईल. यावेळी भंडाऱ्याची मुक्त उधळण आणि येळकोट येळकोटच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन जाईल. यळकोट यळकोटचा गजर आणि भंडाऱ्याची उधळण सध्या जेजुरीत पाहावयास मिळत आहे. खंडेरायाची जेजुरी सोन्यासारखी पिवळीधमक झाली आहे.अनेक ठिकाणी तळी आरती केली जाते. वर्षभरातील खंडेरायाच्या प्रमुख यात्रांपैकी ही सोमवती अमावस्येची यात्रा समजली जाते.