अधोगतीकडे नेणारे स्वागत

Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2024-12-31 12:07:23

अनेक सुखद अन्‌ दुःखद घटनांची शिदोरी सोबत घेत आपण आज, मंगळवारी (दि. ३१) इंग्रजी वर्ष २०२४ ला निरोप देणार असून, नववर्ष २०२५ चे स्वागत करणार आहोत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व तेलंगणातील काही मराठी भाषिक भाग व जगातील मराठी बांधव गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा दिन म्हणून साजरा करतात. मराठी नववर्ष स्वागताचे स्वरूप उत्साही व धार्मिक असते, तर इंग्रजी नववर्ष स्वागताचे स्वरूप म्हणजे तरुणाईच्या जल्लोषाचा दिवस मानला जातो. नववर्षात नवसंकल्प केले जातात. मात्र, भारतीय तरुणाई याच नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्रभर नशेत झिंगत असते. अनेक तरुण या दिवशी अमली पदार्थ व दारूच्या आहारी जात नववर्षाचे स्वागत करतात. या नववर्ष स्वागताचे स्वरूप आता पूर्णपणे व्यावसायिक झाले आहे. विविध हॉटेल्स, मॉल, बार, कॅफे हे विविध कल्पना लढवत या तरुणाईला आकर्षित करतात. या हॉटेल, बार, कॅफे चालकांना सरकारचेही तेवढेच सहकार्य लाभते. सरकारला तरुणाईची काळजी वाटत असेल तर त्यांनी अशा आततायी उत्सवांना खरेतर परवानगी नाकारायला हवी. काही लाखांच्या महसुलासाठी सरकारकडून उचललेले जाणारे हे पाऊल म्हणजे नवीन पिढीच्या बरबादीला खतपाणी घालण्यासारखे आहे. सरकार आपल्याचा बाजूने आहे व भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आपल्याच खांद्यावर आहे, अशा आविर्भावात बार, हॉटेल व कॅफेमालक वावरत असतात. सरत्या वर्षात पुण्यात पोर्श कारच्या अपघातानंतर पोलीस, बारमालक, कॅफेचालक यांची मिलिभगत चर्चेचा विषय ठरली. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये सतरावर्षीय अल्पवयीन मुलाने मध्यरात्रीपर्यंत एका पबमध्ये मित्रांसोबत पार्टी केली व आपली पोर्श ही लक्झरी कार भरधाव चालवत दोघांचे जीव घेतले. या आरोपीला अटक झाली; परंतु फक्त १५ तासांत त्याला जमीन मंजूर करण्यात आला. अल्पवयीन असल्यामुळे त्याला केवळ ३०० शब्दांचा निबंध लिहून देण्याची शिक्षा झाली. ही शिक्षा म्हणावी की कायद्याची चेष्टा, असा प्रश्न अनेकांना आजही सतावत आहे. या घटनेनंतर पुणे महापालिकेने अनेक बारमालक व कॅफेमालकांचे अवैध बांधकाम हटवले. मात्र, पुन्हा जैसे थे परिस्थिती आहे. एकेकाळी ज्ञानाची गंगा वाहणाऱ्या पुण्यात आता दारूची गंगा वाहत आहे. जगभर विकले जाणारे एमडी ड्रग्जसारखे अमली पदार्थ पुणे, मुंबई व नाशिकसारख्या शहरांत सहज उपलब्ध होतात. नाशिक-पुण्यामध्ये तर एमडी ड्रग्ज बनवणारे कारखानेच आढळले. ज्या ठिकाणी ज्ञानाची मंदिरे होती तेथे आता तरुणाईला आकर्षित करण्यासाठी मदिरालये, ड्रग्जसारखे कारखाने अवैधपणे सुरू आहेत. ही प्रगती म्हणावी की अधोगती? नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक कोटीहून अधिक रुपयांची बनावट दारू जप्त केली आहे. ही बनावट दारू पुण्यासह गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात येणार होती. दुसरीकडे, नागपूरमध्येही पोलिसांनी ५० लाखांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त केले. पोर्श कार दुर्घटनेनंतरही पुण्यातील पब व बारमालकांची मुजोरी अद्याप गेलेली दिसत नाही. कारण येथील एका पबमालकाने ३१ डिसेंबरला तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंडोम अन् ओआरएसचे पाकीट वाटप करण्याची अफलातून योजना आखली आहे. या घटनेची वाच्यता होताच तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही सुरक्षेच्या आयुधांमध्ये कंडोम व ओआरएसचे पाकीट देणार असल्याचा दावा या पबने केला आहे. पोलिसांनीदेखील याप्रकरणी पबमालकाची चौकशी करण्याऐवजी या पार्टीसाठी येणाऱ्या लोकांचे जबाब नोंदवून कंडोम वाटणे हा गुन्हा नसल्याचा निर्वाळा दिला आहे. रात्रीतून अशी कोणती जनजागृती केली जाणार होती? विकृतीच्या नावाखाली सुरू असलेली ही जागृती पोलिसांना समजू नये, याचे आश्चर्य वाटते. 'विद्येचे माहेरघर' म्हणून पुण्याची जगभरात ओळख आहे. बुधवारपेठ हा पुण्यातील सर्वांत जुना परिसर. पुस्तकांची बाजारपेठ अर्थात, 'अप्पा बळवंत चौक' बुधवार पेठेला लागूनच आहे. या चौकात दिवसभर पुस्‍तके खरेदी करणाऱ्यांची गर्दी होते. मात्र, सूर्य मावळतीला जाताच या परिसरात वेश्‍याव्यवसाय गजबजतो. आता या व्यवसायाला कॉर्पोरेट लुक दिला जात आहे. याचा प्रत्यय पबसारख्या ठिकाणी होणाऱ्या कंडोम वाटपावरून लगेच लक्षात येते. कोरोना काळात सरकारने सर्वांत प्रथम दारूची दुकाने उघडण्यास प्राधान्य दिले. कारण काय तर महसुलात वाढ व्हावी म्हणून. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांची पहिलीच बैठक बोलावली. मात्र, या बैठकीत दारू व बिअर बार दुकानांची संख्या वाढविण्याचा सल्ला या अधिकाऱ्यांनी दिला. यावरून सरकारी अधिकाऱ्यांच्या दिवाळखोर बुद्धीची कल्पना येते. हा प्रकार म्हणजे ‘तुझी दाढी जळू दे, पण माझी विडी पेटू दे’ असाच म्हणावा लागेल. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर तळीरामांना आवर घालण्यासाठी नाशिकसह राज्यातील पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पण ही सज्जता नेमकी कशासाठी, हे लक्षात येत नाही. शहरात ठिकठिकाणी पोलीस दोन दिवस नाकाबंदी करणार आहेत. दुसरीकडे, सरकार पहाटेपर्यंत बार व दारूची दुकाने उघडी ठेवणार आहे. सरकार याद्वारे पोलिसांची परीक्षा घेणार आहे की, मद्यपींची, हेच कळायला मार्ग नाही. सरकारची ही नीती तरुणाईला अधोगतीकडे नेणारी आहे, हे नक्की!