नववर्षाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज
शहरात ‘मिशन ऑलआउट’अंतर्गत नाकाबंदी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-31 12:43:25

लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : नववर्षाच्या स्वागतानिमित्त शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. मद्यपी आणि टवाळखोरांसह गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी शहर पोलिसांनी मिशन ऑलआउट जाहीर केले आहे. त्यानुसार, चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त, नाकाबंदी सुरू झाली आहे. तसेच साध्या वेशातही पोलिसांचा पहारा राहणार असून, सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे, असे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आवाहन केले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आयुक्त कर्णिक बोलत होते. यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, किरणकुमार चव्हाण आदी उपस्थित होते. आयुक्त कर्णिक म्हणाले की, जिल्ह्यात नववर्ष स्वागयासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी पारंपरिक मोहीम हाती घेतली आहे. हॉटेल्स, बार, परमिट रूमची नियमित तपासणी पोलिसांकडून होत आहे. सोसायट्यांसह खाजगी जागांत विनापरवानगी मद्य पार्टी करणाऱ्यांवरही गुन्हे नोंदविण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तरुण वर्गासह हौशी नाशिककरांनी पर्यटनस्थळांसह रिसॉर्ट, फार्म हाउस व बारमध्ये पार्टीचे नियोजन केले आहे. १ जानेवारी २०२५ला पहाटे पाचपर्यंत बंदिस्त ठिकाणी परवानगीने ‘चिअर्स’ करता येणार असल्याने मद्यप्रेमींच्या उत्साहात भर पडली आहे. यापार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दीड हजार अंमलदारांचा फौजफाटा
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चार उपायुक्त, सात सहाय्यक आयुक्तांसह स्थानिक पोलिसांची, गुन्हे शाखेची पथके तैनात राहणार आहेत. तसेच वाहतूक पोलिसांची चार पथके, निर्भया व दामिनी मार्शल्सदेखील गस्त घालणार आहेत. यासाठी सुमारे ४० पोलीस निरीक्षक, १५० सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक, दीड हजार अंमलदारांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे.
शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त
एकतीस डिसेंबरनिमित्त शहरात ‘स्टॉप ॲण्ड सर्च’ कारवाईचे आदेश आहेत. अमली पदार्थांचा वापर कुठेही होणार नाही, यासाठी शोधमोहीम वाढविण्यात येईल. शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त नेमण्यात येणार असून, नियंत्रण कक्षात त्याबाबत माहिती ठेवली जाईल, असे पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सांगितले आहे.