सोमवती अमावस्येनिमित्त मार्कंडेय यात्रोत्सव उत्साहात

भाविकांच्या गर्दीमुळे परिसर गजबजला

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-31 13:00:17

लोकनामा प्रतिनिधी

सप्तशृंगगड  : सोमवती अमावस्येनिमित्त मार्कंडेय पर्वतावर हजारो भाविकांनी हजेरी लावत श्रीमार्कंडेय ऋषींचे दर्शन घेतले. यात्रोत्सवासाठी सोमवारी पहाटेपासूनच हजारो भाविक मार्कंडेय पर्वतावरील मुळाणे बारी, मार्कंड पिंपरी, सप्तशृंगगड चीरखानी बाजूने अवघड कडे चढून वर जात होते.पर्वताच्या पायथ्याशी मुळाणे बारीपर्यंत भाविक खासगी वाहनांनी येत होते. याठिकाणी भाविकांच्या वाहतुकीसाठी कळवण व वणी बसस्थानकांतून जादा बसेसची व्यवस्था केलेली होती. 

मात्र बसगाड्या कमी असल्याने खासगी वाहनांद्वारेच मोठ्या संख्येने भाविक पर्वताच्या पायथ्याशी दाखल झाले होते. पर्वताच्या शिखरावर दक्षिणमुखी असलेल्या मार्कंडेय मंदिरात उत्तर दिशेस मुख करून पद्मासन घालून बसलेल्या आश्वासक तेजोमय मार्कंडेय ऋषींच्या मूर्तीच्या दर्शनाने पर्वत चढून आल्याचा थकवा क्षणात दूर होऊन प्रसन्न मनाने व  भक्तिभावाने चिंब होत भाविक परतत होते. मंदिराभोवती अत्यंत अरुंद जागा असल्याने व त्यातच वन विभागाने भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लावलेले लोखंडी बॅरिकेड्स पडल्यामुळे काही स्वयंसेवक मानवी कडे तयार करून भाविकांना दर्शन सुलभ करून देत होते. पहाटेपासून दर्शनासाठी लागलेली भाविकांची रांग सायंकाळी पाचपर्यंत होती.पर्वताचे पठार व मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रसाद, पूजा साहित्याची दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली होती. सोमवती यात्रा यशस्वितेसाठी व भाविकांना सुविधा पोचविण्यासाठी मार्कंडेय न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. कळवण पोलीस विभाग व वन विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता. 

दुसऱ्या रस्त्याची आवश्यकता

सप्तशृंगगडासमोरील मार्कंडेय पर्वतावर दर सोमवती अमावस्येला यात्रा भरते. तसेच येथे वर्षभर भाविक व पर्यटक येत असतात. जाण्या-येण्यासाठी अवघड पायवाट असल्यामुळे वृद्ध, महिला, मुले, दिव्यांग भाविक पर्वतावर जाऊ शकत नसल्याने गडावर आलेल्या भाविकाला मार्कंडेय पर्वतावरही जाता यावे, यासाठी रोप-वेचा प्रकल्प होणे गरजेचे आहे. तसेच गडावर जाण्या-येण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगड हा दहा किलोमीटरचा रस्ता आहे. मात्र, यात्रोत्सवात गडावरील गर्दी लक्षात घेता ‘तिरुपती पॅटर्न’प्रमाणे वणी-चंडिकापूर बाजूने दुसरा रस्ता तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने व वन विभागाने सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू केली असली, तरी त्याकडे अधिक लक्ष देऊन काम गतीने पूर्णत्वास नेण्याची गरज आहे.