केशवराव पटेल मार्केटचा झाला उकिरडा
गतवैभव प्राप्त करून देण्याची ग्रामस्थांची मागणी
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2024-12-31 13:10:46

लोकनामा प्रतिनिधी
येवला : शहराच्या मध्यवस्तीत भाजीपाला विक्रीसाठी मार्केट आणि त्यावर संस्कृती संवर्धनासाठी मोठे सभागृह असावे, या उद्देशाने येवला पालिकेने उभारलेल्या कै. केशवराव पटेल भाजी मार्केटला अवकळा आली आहे. भाजीबाजार कधीच मार्केटच्या बाहेर आला असून, मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. त्याचबरोबर मार्केटच्या अंतर्गत भागात कमालीचे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. भाजी मार्केटला गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी अनेकदा झाली आहे.
संघनिष्ठ कै. केशवराव पटेल यांच्या नावाने हे एकमेव मार्केट आहे. स्व. केशवराव पटेल यांच्या नावाचा वापर अनेकदा सत्ता आणण्यासाठी केला गेला. गेली पाच वर्षे पालिका संपूर्णपणे भाजपच्या अधिपत्याखाली असतांनाही अकार्यक्षम नेतृत्वामुळे मार्केटला गतवैभव प्राप्त झाले नाही, अशी खंत संघप्रेमींनी व्यक्त केली आहे.
तत्कालीन नगराध्यक्ष लोकनेते स्व. प्रभाकरदादा कासार यांनी अथक परिश्रमातून मार्केटची निर्मिती केली होती. त्यामुळे राज्यात एक अव्वल दर्जाचे भाजी मार्केट तयार झाले. या मार्केटमुळे येवल्याला दिमाखदार वैभव प्राप्त झाले. परंतु हे वैभव फार काळ टिकू शकले नाही. चांगल्या मार्केटमधून भाजीपाला विक्रेते शनी पटांगणाच्या प्रांगणात बसू लागले आणि मार्केट ओस पडले. ऐतिहासिक शनी पटांगणाचीदेखील यामुळे वाताहत झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, (स्व.) अटल बिहारी वाजपेयी यांच्यासह दिग्गज मंडळींच्या सभा या प्रांगणात झाल्या आहेत. शहरात हे एकमेव पटांगण शिल्लक आहे, पण भाजीबाजार आणि एकूणच अतिक्रमणामुळे पटांगण मोकळा श्वास घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे.
निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन
भुजबळांच्या जाहीरनाम्यात कै. केशवराव पटेल मार्केटबाबत ठोस कार्यवाही करण्याबाबत उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे याबाबत हालचाल होईल, अशी अपेक्षा येवलेकर व्यक्त करीत आहेत.
विक्रेत्यांच्या उदासीनतेचा फटका
या मार्केटमध्ये मुळातच भाजीपाला विक्रीसाठी ओटे आणि माल ठेवण्यासाठी जागा बांधून देण्यात आली होती. काही काळ हे मार्केट उत्तम पद्धतीने चालले. परंतु पालिकेच्या दुर्लक्षामुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे अनेक विक्रेते मार्केट बाहेरच बसू लागल्याने या मार्केटला अवकळा आली. मार्केटचा वापर नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. आज हे मार्केट वापरण्यायोग्य नसल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. भाजी विक्रेत्यांनी भाजीपाला विक्रीसाठी कोठे बसावे? कसे बसावे? याला पालिकेचे काही नियम असल्याचे दिसत नाही, असले तरी ते कागदावर आहेत. ग्राहकदेखील कोठेही गाडी पार्क करून भाजीपाला खरेदी करीत असल्याने वाहतुकीची कोंडी शनी पटांगणसह या भागात नेहमी होत असल्याचे अनुभवास येते.
वाहतूक कोंडीची समस्या
सध्या सर्व्हे नंबर ३८०७ आणि ३८०८ येथे पालिकेने मोठे शॉपिंग कॉम्प्लेस उभारले आहे. राजकारण्यांची उदासीनता आणि विस्थापित गाळेधारकांचा प्रश्न यांमुळे अद्याप शॉपिंग कॉम्प्लेस सुरू होऊ शकलेले नाही. येथेच भाजीविक्रेते बसत असल्याने वाहतूक कोंडी होते. जुन्या बाजारतळात लाखो रुपये खर्च करून ओटे बांधले तरीही येथे दररोज भाजीपाला विक्रेते येत नाहीत.
नव्या स्वरुपात उभारणी करावी
कै. केशवराव पटेल मार्केटची झालेली दैना मिटावी. मार्केटची दुरुस्ती किंवा थेट जमीनदोस्त करून नव्या रूपात मार्केट व्हावे, अशी येवलेकरांची इच्छा आहे.
- अमोल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, येवला