शरणागती की मांडवली?

Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2025-01-01 14:40:51

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड, तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराडने पुण्यात सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. सीआयडीने त्याला अटकही केली. कराडची ही शरणागती म्हणावी की राजकीय मांडवली की, आपले एन्काउंटर होईल या भीतीने त्याने उचललेले पाऊल म्हणावे. पण हा सर्व प्रकार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. राजकीय वरदहस्त असेल तर रंकचा राजा अन्‌ राजाचा रंक कसा होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे वाल्मीक कराड होय. देवाचे नाव धारण करून काळे कारस्थान करणाऱ्या कराडमुळे राज्यासह देशात गाजलेल्या अब्दुल करीम तेलगी प्रकरणाची आठवण झाली. भारतात सर्वांत मोठा बनावट स्टॅम्प पेपर (मुद्रांक शुल्क) घोटाळा करणाऱ्या या अब्दुल करीम तेलगीने शासनव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली होती. त्याने पोलीस कॉन्स्टेबलपासून ते नोकरशहा व महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या राजकीय नेत्यांना लाच देत आपला व्यवसाय प्रचंड प्रमाणात वाढवला होता. त्याचा हा बनावट स्टॅम्प पेपरचा व्यवसाय इतका अजस्त्र होता की, देशातील १३ राज्यांना त्यामुळे नुकसान सोसावे लागले. हे नुकसान इतके मोठे होते की, कोणत्याच राज्यातील पोलिसांना या प्रकरणात झालेल्या सरकारी संपत्तीचे नुकसान मोजता आलेले नाही. या प्रकरणात तत्कालीन अन्न व औषध प्रशासनमंत्री छगन भुजबळ यांचे नाव जोडले गेले व त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. तेलगीप्रमाणेच कराडने राजकीय पाठबळावर आपले साम्राज्य निर्माण केले आहे. राजकीय वरदहस्तामुळे बीड जिल्हा हे मुंडे घराण्याचे कमी मात्र, त्याचे संस्थान बनले होते. त्याची कटकारस्थाने सांगताना सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या आमदारांना सभागृहात रडू कोसळले. यावरून कराडच्या दहशतीची कल्पना येऊ शकते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर २२ दिवसांनीही पोलीस त्याला पकडू शकले नाहीत. त्याला जेरबंद करावे म्हणून बीडमध्ये मोर्चा, आंदोलने झाली. सर्वपक्षीय एकत्र आल्याने सरकारला नमते घेत ‘चोर नाही तर चोराची लंगोटी’ याप्रमाणे कराड व इतर संशयित आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले. या सर्वांची बँक खाती गोठवल्याचे बोलले जात असले, तरी याबाबत अधिकृत माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. पण या सर्व पार्श्वभूमीवर कराडने आपला ‘दिलदारपणा’ दाखवत शरणागती पत्करली आहे. अर्थात, शरणागती ही काही एकतर्फी होत नाही. यात काही गुप्त करार केले जातात, वाटाघाटी केल्या जातात. शरणागती पत्करण्यापूर्वी वाल्मीकने व्हिडिओ शेअर करून मला अटकपूर्व जामीन घेण्याचा अधिकार असताना, मी सीआयडीसमोर हजर होत असल्याचे सांगून आपल्या ‘दिलदारपणा’चे दर्शन घडविले आहे. आपला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा करत राजकीय स्वार्थासाठी माझे नाव घेऊ नये. या प्रकरणात मी दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी, असे स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ कराडचा असला, तरी याची स्क्रिप्ट मात्र राजकीय स्वरूपाची वाटते. त्याच्या व्हिडिओवरून त्याला कायदेविषयक सल्ले त्याच्या पोलीसमित्रांनी दिले असावेत, असे वाटते. सरपंच देशमुख यांच्या हत्येशी कराड याचा दुरान्वयेही संबंध नव्हता तर त्याला इतके दिवस अज्ञातवासात का राहावे लागले? अटकेपूर्वी हा दावा करताना इतके दिवस कराडच्या विरोधात प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेले व्हिडिओ पाहता हा दावा यापूर्वी किंवा घटनेनंतर लगेचच त्याने केला असता, तर एवढे राजकारण रंगले नसते. मात्र, इतके दिवस सरकारी यंत्रणेला पोसणाऱ्या कराडला हेही दिवस जातील असे वाटत असावे. पण त्याची कारस्थाने पाहता नवनियुक्त महायुती सरकारचे पहिलेच अधिवेशन त्याच्याच सुरस कथांनी गाजले. या प्रश्नावरून सत्ताधारी व विरोधक पहिल्यांदाच एकत्रित आलेले दिसले. सभात्याग होण्याऐवजी त्याची कारस्थाने मांडण्यासाठी सभागृहाच्या कामकाजाचा कार्यकाळ कमी पडू लागला. कराडच्या शरणागतीनंतर तो कुणाच्या सांगण्यावरून शरण आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कराड २२ दिवस बिनधास्त महाराष्ट्रात फिरतो. अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतो. पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल होतो. मात्र, मंत्री धनंजय मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होताच तो शरणागती पत्करतो. सीआयडीने त्याला ताब्यात घेतले असले, तरी त्याच्यावर आता कोणत्या कलामांतर्गत कारवाई केली जाणार हादेखील संशोधनाचा विषय आहे. कराडला पोलिसांनी ताब्यात घेतले असले, तरी त्याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येत सहभागाचा अथवा खुनाचा गुन्हा त्याच्यावर अद्याप तरी दाखल नाही. तो शरण आल्यामुळे पोलिसांची न्यायालयाच्या आडून त्याच्यावर मेहेरबानी राहणार, हे निश्चित आहे. शरणागतीमुळे मोक्कासारखे गुन्हे त्याच्यासाठी गौण ठरतील. आपल्या शरणागतीचा दिवसदेखील कराडने विचारपूर्वक निवडलेला दिसतो. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका’ या ओळीचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावणारे आपण नववर्षात या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार! आरोपी पोलिसांच्या हाती लागले आता पोलीस अन्‌ न्यायालय पाहून घेतील, असे म्हणून आपण हात झटकणार आणि पुन्हा एखादा तेलगी, कराड निर्माण होण्याची वाट पाहणार!