भगवतीचरणी लाखो भाविक नतमस्तक
नववर्ष सुख-समृद्धीचे जाण्यासाठी घातले साकडे
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2025-01-01 15:31:13
लोकनामा प्रतिनिधी
सप्तशृंगगड : नववर्षाच्या पूर्वसंध्येला सुमारे ४० हजारांवर भाविकांनी सप्तशृंगीच्या तेजोमय, प्रफुल्लित, आश्वासक मूर्तीसमोर नतमस्तक होत नववर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे व भरभराटीचे जावे, यासाठी देवीला साकडे घालीत आशीर्वाद मागितले.
धनुर्मास उत्सव, शाकंभरी नवरात्रोत्सव व नववर्षाची सुरवात असा तिहेरी योग साधत आज (दि. ३१ डिसेंबर) हजारो भाविकांनी एकच जल्लोष करीत आई भगवतीचा जयघोष केला. चालू वर्षातील अखेरचा दिवस आणि नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर आई भगवतीचे दर्शन घेण्यासाठी थंडीच्या कडाक्यातही भाविक खासगी वाहनांनी गडावर मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सकाळी देवीची पंचामृत महापूजा होऊन देवीला निळ्या रंगाचा शालू नेसवण्यात आला. तसेच सोन्याचा मुकुट, कमरपट्टा, नथ, पावले, मंगळसूत्र, मोहनमाळ, सोन्याचा मुलामा असलेली चांदीची पावले आदी दागिने घालण्यात आले होते. सकाळी सातपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
काल व आज मंदिर २४ तास भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवल्याने रात्रभर भाविकांची कमी-जास्त प्रमाणात वर्दळ सुरूच होती. नाताळच्या सुट्या व सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सप्तशृंगगडावर हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावायला सुरुवात केली होती.
यावेळी गडावर भक्तांची मांदियाळी बघायला मिळाली. सप्तशृंगी मातेच्या दर्शनानंतर भाविकांनी समाधान व्यक्त केले. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी सायंकाळपासूनच गडावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. संस्थानाची निवासस्थाने हाउसफुल्ल झाली असल्याचे सांगण्यात आले. गावातील खासगी हॉटेले व लाॅजिंगदेखील फुल्ल झाले आहेत.
सुलभ दर्शनाची सोय
भाविक-भक्तांचे सुलभ दर्शन व्हावे, यासाठी भगवती सप्तशृंग निवासिनी देवी संस्थान व प्रशासनाच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले होते. पायरी रस्त्यावर भाविकांना मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, याबरोबरच अत्यावश्यक सेवा तत्पर ठेवण्यात आल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे यांनी दिली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातून देवीभक्त नाताळच्या सुट्यांत सप्तशृंगी मातेला साकडे घालण्यासाठी दरवर्षीच सप्तशृंगगडावर हजेरी लावत असतात.