महाराष्ट्रात पहिले एआय धोरण जाहीर होणार

मंत्री आशिष शेलार यांनी आढावा घेऊन दिले निर्देश

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2025-01-01 17:03:06

 मुंबई : सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता सॉफ्टवेअर आणि एआयचा काळ सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्र ज्या झपाट्याने वाढले, त्याच झपाट्याने आता या क्षेत्रात क्रांती होताना दिसून येते. त्यामध्ये डिजिटलायजेशनंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले, एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांनी बुधवारी विभागाला दिले. 

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असे त्यांनी यावेळी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहावर बुधवारी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मंत्री आशिष शेलार यांनी विभागाचा आढावा घेत अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीविषयी मार्गदर्शन करताना म्हटले की, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे. मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इंडिया एआय मिशन' अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी ₹१०,३७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.