नववर्षानिमित्त देवदर्शन घेतले: पण काळाने घातला घाला

सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर अपघातात चार भाविक ठार

Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2025-01-01 18:40:35

सोलापूर : सोलापूर-गाणगापूर रस्त्यावर भाविकांच्या स्कार्पिओ मोटारीची आणि आयशर मालमोटारीची समोरासमोर धडक बसून घडलेल्या अपघातात कारमधील चार भाविकांचा  मृत्यू झाला. अन्य  पाच भाविक जखमी झाले. यातील सर्व मृत आणि जखमी नांदेड जिल्ह्यातील राहणारे आहेत. नवीन वर्षाचे औचित्य साधून देवदर्शनासाठी निघालेल्या या भाविकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 हे भाविक स्कार्पिओ मोटारीतून नववर्षानिमित्त अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आटोपून पुढे श्री दत्तात्रयाच्या दर्शनासाठी  गाणगापूरकडे निघाले होते. परंतु अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेल्या मैंदर्गी येथे शाब्दी फार्म हाऊससमोर त्यांच्या मोटारीची आणि समोरून येणाऱ्या आयशर मालमोटारीची जोरदार धडक झाली. या अपघातात भाविकांपैकी दोन पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यांची नावे समजू शकली नाहीत. अन्य पाचजण गंभीर जखमी झाली असून त्यांना अक्कलकोटच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.