कोठडीत पहिल्याच रात्री कराडची प्रकृती खालावली
रात्री ऑक्सिजन लावण्याची आली वेळ
Written by लोकनामा ऑनलाईन महाराष्ट्र 2025-01-01 19:11:45
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड याला सीआयडी कोठडी मिळाल्यानंतर येथील कारागृहात ठेवण्यात आले. रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. नंतर त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला.
मंगळवारी (दि. ३१) रात्री डॉक्टरांच्या पथकाने त्याची तपासणी केली. बुधवारी (दि. १) त्याची तब्येत रात्रीच्या तुलनेत बरी होती. कराडने मंगळवारी (दि. ३१) पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. बुधवारी (दि. १ जानेवारी) रात्री उशिरा त्याला केज न्यायालयात सादर केले असता, सीआयडीच्या १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. सरपंच देशमुख यांच्या हत्याप्रकरणी कराडवर गंभीर आरोप होत आहेत. पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी दबाव असतानाच तो सीआयडीला शरण आला. कराडची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली होती. त्याने रात्री जेवण केले नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली. शिवाय सकाळी नाश्ता केलेला नव्हता. कराडला मधुमेह आहे. त्याला रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्याने तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला. सध्या त्याची गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरू आहे. सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडून बुधवारी त्याची चौकशी सुरू होती. सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरारी आहेत. त्यांचा शोध लागलेला नाही. त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी कराडची चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.