‘थर्टी फर्स्ट’चा उन्माद

Written by लोकनामा ऑनलाईन अग्रलेख 2025-01-02 12:31:52

नवीन वर्षाच्या स्वागताच्या नादात प्रमुख शहरांमधून तरुणाईचा उन्माद दिसला. मुंबईत नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबरला पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १८ हजार ८०० जणांवर कारवाई करत ८९ लाखांचा दंड वसूल केला. नाशिकमध्ये दारू पिऊन एका गुंडाने दुसऱ्या गुंडाची डोक्यात दगड घालून हत्या केली. एकीकडे शासनाने मध्यरात्रीपर्यंत दारू दुकाने, बार व पब ही मद्य पुरविणारी दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यायची व दुसरीकडे, कोठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस रात्रभर रस्त्यावर तैनात ठेवायचे. पोलिसांनी एकट्या मुंबईत १८ हजार ८०० जणांवर कारवाई केल्याचे जाहीर केले असले, तरी त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेला दंड हा अल्प प्रमाणात दिसत आहे. हा मुंबईतील कारवाई व दंड वसुलीचा आकडा असला, तरी अद्याप इतर शहरांतून येणारी आकडेवारी जाहीर व्हायची आहे.  केवळ दारू पिऊनच नाही, तर वाहतुकीच्या इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी जवळपास एक कोटीची दंडवसुली एका रात्रीतून केली आहे. अशीच तत्परता पोलिसांनी एक आठवडा दाखवली तरी ही आकडेवारी दहा कोटींच्या आसपास जाऊ शकते. मात्र, पोलिसांना शासनाची तिजोरी भरताना आपल्या रिकाम्या खिशाचीही तेवढीच काळजी असते. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम मात्र अल्प आहे. अर्थात, शहरे वाढली मात्र त्या प्रमाणात पोलीस व वाहतूक पोलिसांची संख्या वाढली नाही, हेदेखील एक कारण आहे. आहे त्या पोलिसांनी आपले काम इमानेइतबारे केले तरी शासनाच्या महसुलात एकटे पोलीस खाते मोठ्या प्रमाणात गंगाजळी निर्माण करू शकते, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पोलिसांनी आपला अर्धाअधिक भार हा सीसीटीव्हीवर सोपवून दिल्याने त्यांचा भार कमी होत असला, तरी त्यांच्यात एकप्रकरे आळसावलेपण निर्माण झाले आहे. गुन्हे दाखल करून घेण्यापेक्षा ते मिटवण्याकडे पोलिसांचा अधिक कल असतो. त्यातून गुंडगिरीला प्रोत्साहन मिळते. एखाद्याचा साधा मोबाईल जरी हरवला तरी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत. अशीच अवस्था वाहनचोरी व किरकोळ घरफोड्यांबाबत दिसते. त्यातून गुन्हेगारांचे मात्र फावते. कारण दोन फटके किंवा चोरीतील काही वाटा मिळाला की, गुन्हा आपोआप दाबला जातो. ३१ डिसेंबरला सेलिब्रेशन हे आता फॅड बनले आहे. परदेशातून आलेल्या या अशा विकृत संस्कृतीला इनकॅश करत आपला महसूल कसा वाढेल यावर सरकारचे लक्ष असते. सरकार सवलती देते असेल तर तरुणाई याचा फायदा उचलणारच. कारण सरकारकडून देण्यात येणाऱ्या या सवलती तरुणाईच्या पथ्यावर पडतात. थर्डी फर्स्टला रात्रभर दारू रिचवायची अन्‌ रस्त्यावर उतरून धिंगाणा घालायचा. यातून काही गुन्हे घडले तर तरुणाईवरच दोष ढकलून देण्यास सरकार व पोलीस तत्पर असतात. तरुणाईला वाहवत नेणाऱ्या थर्डी फर्स्टसारख्या उपक्रमांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे असताना सरकार एकप्रकारे त्याला प्रोत्साहन देत आहे. यापेक्षा या दिवसाचे औचित्य साधून तरुणाईसाठी चांगले उपक्रम राबविण्याची सरकारकडून अपेक्षा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन (अंनिस)सारख्या संस्था याकामी पुढाकार घेताना दिसत आहेत. ‘द दारूचा नव्हे, तर द दुधाचा’ हा उपक्रम काही वर्षांपासून अंनिस राबवत आहे. मद्याला विरोध करत मोफत दूधवाटप करत आहे. अंनिसला हे जमते, मग सरकारला का असे विधायक उपक्रम राबवता येत नाहीत? मद्यविक्री करणाऱ्या दुकानातून १८ वर्षांखालील मुलाला मद्य देऊ नये व बारमध्ये प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. मात्र, या नियमाचे सर्रास उल्लंघन होताना दिसते. आता तर तरुणीदेखील दुकानातून मद्य खरेदी करताना दिसत आहेत. बार, पब हे तरुणाईच्या विरंगुळ्याची केंद्रे बनत चालली आहेत. भारतीय सणांमधून बाजारपेठेत चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण असते. थर्टी फर्स्टसारख्या उपक्रमातून रस्त्यावर भीतीचे, दहशतीचे वातावरण दिसते. त्यामुळे अनेक कुटुंबे या दिवशी स्वतःला घरात बंदिस्त करून घेतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक कुटुंबे तीर्थाटनाला प्राधान्य देतात. मात्र, रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांचा त्यांना नाहक ससेमिरा मागे लागतो. शासन व पोलीस यंत्रणा या दिवशी आपण केलेल्या कारवाईचे आकडे जाहीर करून आपली पाठ थोपटून घेताना दिसत आहे. पण ही वेळ येऊ नये यासाठी उपाययोजना करताना दिसत नाहीत. नववर्षाच्या स्वागताला एकीकडे मंदिरांमधून गर्दी होताना दिसत आहे, तर दुसरीकडे बार व पबमधून तरुणाई दारूसह अमली पदार्थांचा वापर करताना दिसत आहे. एकदा का डोक्यात नशा झिंगली की, या तरुणाईला स्वतःचे भान राहत नाही. यातून अपहरण, खून, अत्याचार यांसारख्या घटना घडतात. याचा सर्व त्रास मात्र सामान्य माणसाला होतो. कोजागरीला प्याले जाणारे दूध व थर्टी फर्स्टला प्याली जाणारी दारू ही भारतीय व पाश्चात्य संस्कृतीमधील फरक प्रखरतेने दर्शवते. राममंदिरे उभारून देशात रामराज्य निर्माण होणार नाही, तर तरुणाईला रामाचे विचार-आचार, नीती आचरणात आणावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा इंग्रजी नववर्षाच्या स्वागताला सरकारच्या उत्पन्नवाढीच्या प्रोत्साहनामुळे तरुणाईचा उन्माद हा वर्षानुवर्षे सुरूच राहणार!