फसवणूक रोखण्यासाठी ‘जागो ग्राहक जागो ॲप’

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 12:38:57

ऑनलाइन सेवांचा वापर वाढलेला असताना ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याची उदाहरणेही समोर येत आहेत. यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ‘जागो ग्राहक जागो ॲप’, ‘जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' सुरू झाले आहे. यामुळे ग्राहकांचे ऑनलाइन फ्रॉड, डार्क पॅटर्नपासून संरक्षण होण्यास मदत होईल.
          केंद्रीय ग्राहक संरक्षण विभागाने राष्ट्रीय ग्राहकदिनी २४ डिसेंबर रोजी सार्वजनिक वापरासाठी ‘जागो ग्राहक जागो ॲप’, ‘जागृती ॲप’ व ‘जागृती डॅशबोर्ड’चा प्रारंभ केला आहे. डिजिटल युगात ग्राहक संरक्षण बळकट करण्यासाठी, तसेच ई-कॉमर्स आणि ऑनलाइन सेवांमधील अन्यायकारक पद्धतींना आळा घालण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने २०२३ मध्ये डार्क पॅटर्नचे प्रतिबंध आणि नियमनासाठी मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली. 
         तेरा डार्क पॅटर्न निर्दिष्ट केले. ते पुढीलप्रमाणे : खोटी निकड, बास्केट स्नीकिंग, कन्फर्म शेमिंग, फोर्सड ॲक्शन, सबस्क्रिप्शन ट्रॅप, इंटरफेस, बेट ॲन्ड स्विच, ड्रीप प्राइसिंग, डिसगाइज्ड ॲडव्हर्टाइजमेंट आणि नॅगिंग, ट्रीक वर्डिंग, सास बिलिंग आणि रॉग मालवेअर्स. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने वैधानिक हेतूचा एक भाग म्हणून, उद्योग भागधारकांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि त्यांना ग्राहक संरक्षण कायदा २०१९ अंतर्गत अनुचित व्यापार पद्धती असलेल्या ‘डार्क पॅटर्न’(ग्राहकाची फसवणूक) करण्यापासून परावृत्त करण्याची विनंती केली. 
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून माहितीपूर्ण पोस्ट, व्हिडिओ व ‘डार्क पॅटर्न’वरील माहितीद्वारे ग्राहकांपर्यंत पोचण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. ‘डार्क पॅटर्न’शी संबंधित तक्रारींचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर आपल्या चमूला प्रशिक्षण दिले आहे. ग्राहक व्यवहार विभाग आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ‘डार्क पॅटर्न’ ओळखण्यासाठी साधने व संसाधनांसह सुसज्ज झाला असून, ग्राहकांना सक्षम करणार आहे. एनसीसी लॅब, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी विभाग, आयआयटीचे प्रिन्स अमन आणि नामित मिश्रा यांनी केलेल्या संशोधनाचा एक भाग म्हणून तीन ॲप तयार केले आहेत.
          जागो ग्राहक जागो ॲप, ग्राहकांच्या ऑनलाइन क्रियाकलापांदरम्यान इंटरनेटबद्दल आवश्यक ई-कॉमर्स माहिती प्रदान करते, तसेच असुरक्षित असल्यास आणि सावधगिरीची आवश्यकता असल्यास त्यांना सतर्क करते. ‘जागृती ॲप’ वापरकर्त्यांना बेकायदेशीर घोषित केलेल्या एक किंवा अधिक ‘डार्क पॅटर्न’बाबत संशय असलेल्या इंटरनेट किंवा इतर कोणत्याही समस्यांची तक्रार करण्याची परवानगी देते. या अहवालानंतर संभाव्य निवारण व त्यानंतरच्या कारवाईसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रारी म्हणून नोंदवले जातात. याव्यतिरिक्त, ‘जागृती डॅशबोर्ड’ॲपचा वापर ई-कॉमर्सवर नमूद केलेल्या ‘डार्क पॅटर्न’बाबत रिअल टाइम अहवाल तयार करण्यासाठी केला जातो. यामुळे प्रभावीपणे ऑनलाइन ग्राहक परस्परसंवादांचे निरीक्षण व नियमन करण्याची क्षमता वाढविणे शक्य होणार आहे. ग्राहकाची फसवणूक (डार्क पॅटर्न) ओळखण्यात मदत करेल, ग्राहक विवादांचे निराकरण जलद करेल व ग्राहकांच्या हितासाठी हानिकारक असलेल्या पद्धतींवर अंकुश ठेवण्यास मदत करेल.
'जागो ग्राहक जागो ॲप' लॉन्च करणे हे ग्राहक संरक्षणाच्या प्रयत्नांत लक्षणीय प्रगती दर्शवते. ही साधने केवळ ग्राहकांना सक्षम करणार नाहीत, तर कंपन्यांना त्यांच्या पद्धतींसाठी जबाबदार धरतील. जसजसे आपण अधिक डिजिटल भविष्याकडे वाटचाल करत आहोत, तसतसे ग्राहकांचे हक्क जपले जातील, याची खात्री करण्यासाठी यासारखे उपक्रम आवश्यक आहेत. 

-सुरेश पाटील ( ८४५९१५१४३१ ) 
(लेखक नाशिक जिल्हा ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष आहेत.)