प्राचीन भारतीय विमानशास्त्र

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 12:43:54

आमच्याकडे प्राचीन काळी सर्व ज्ञान होते, आजचे शोध म्हणजे आमच्या पुरातन ज्ञानाची नक्कल आहे, असे दावे करणाऱ्या लोकांची भारतात कधीच कमतरता राहिलली नाही. अशातलाच एक दावा म्हणजे भारतात प्राचीन काळी विमानेही होती हा. यावर विश्वास ठेवणारे अगदी सुशिक्षितच नव्हेत, तर अगदी आयआयटीत शिक्षण घेतलेले महाविद्वानही आहेत हे विशेष. अर्थात ही मंडळी कोणत्या विचारधारेची असते हे वेगळे सांगायची गरज नाही. यांच्याकडे पुरावे काय, तर महाकाव्यांतील कवी-कल्पनांनी सजलेली वर्णने. पण विमान बनवायचे तर ते बनवायला आवश्यक असणारी यंत्रसामग्री कोठे होती, हा प्रश्न विचारायचा नसतो. विज्ञानाची प्रगती अशी अचानक होत नसते. तिच्या प्रवासाचे टप्पे असतात. साधी सायकल बनवता येणारे चक्क विमान बनवतील ही कल्पना मोहक असली, तरी  शेवटी ती कवीकल्पना आहे व कल्पनाशक्तीसाठी त्या कवींच्या प्रतिभेला नमस्कार केला पाहिजे, पण ते वास्तव होते, असे मानाने वेडगळपणाचे लक्षण आहे.
           बरे, ही कल्पना फक्त भारतातच होती काय? नाही. भारतात ही कल्पना जन्मण्याच्या फार पूर्वी जगात अन्य भागांतही विमान कल्पनेचा जन्म झाला होता. कारण पक्ष्यांप्रमाणे उडता यावे हे माणसाचे पुरातन स्वप्न. जगभरच्या पुराणकथांमध्ये मनुष्य, देवाने दिलेल्या सामर्थ्याने यंत्र बनवून, अन्यथा कृत्रिम पंख लावून उडतो, अशा कल्पना आढळतात. याचा सर्वांत जुना लेखी आणि चित्रांकित पुरावा इसवी सन पूर्व ३००० ते २४०० या काळात क्युनेफार्म लिपीत लिहिल्या गेलेल्या ब्यबिलोनियन ‘एपिक ऑफ ऐटना’ या काव्यात येतो. त्या प्रसंगाचे शिल्पांकनही केले गेले होते. ग्रीक पुराणकथांतील डीडेलस आणि त्याचा मुलगा इक्यरसची कथा प्रसिद्धच आहे. डीडेलसने दोन विमाने बनवली..एक स्वत:साठी, तर दुसरे आपला मुलगा इक्यरससाठी. एजियन समुद्रावरून उड्डाण भरत असतांना इक्यरस तारुण्याच्या उत्साहात वडिलांनी दिलेल्या सूचना पाळत नाही. तो अधिक उंच उडायला जातो आणि उष्णतेने पंखांना लावलेले मेण वितळल्याने समुद्रात कोसळून मरतो, अशी ही कथा. कोलंबियातही विमानसदृश पक्ष्यांच्या प्रतिमा सापडल्या आहेत. (सन १००० ते १५००) चीनमध्ये सम्राट चेंग तांगने (इसवी सन पूर्व १७००) पहिले उडणारे विमान बनवले होते. पण ते त्याने उडायचे शास्त्र कोणी चोरू नये म्हणून नष्ट करून टाकले, असे म्हणतात. 
          चीनमध्येच इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात कवी च्यू युनने विमानातून गोबीच्या वाळवंटाचे निरीक्षण केले असाही वृत्तांत येतो. अशाच लोककथा नेपाळमध्येही आहेत. पेरूमधील नाझ्का रेषांवरून त्या संस्कृतीच्या लोकांना विमाने माहीत होती अथवा परग्रहवासीयांनी त्या रेषा बनवल्या असे मानणारेही खूप आहेत. अद्भुतामध्ये मानवाला प्राचीन काळापासून रस आहे हे खरे, पण अद््भुतरम्य कथा या मनोरंजनासाठी असतात. वास्तव मानण्यासाठी नव्हे, याचे भान असावे लागते.
           भारतीय पुराणकथांतही विमानांचे उल्लेख येतात. रामायणातील पुष्पक सर्वांना माहीतच आहे. समरांगण सूत्रधार या भोजाच्या (अकरावे शतक) ग्रंथात वास्तुशास्त्र, विहिरी/बारव कसे बांधावेत हे वर्णन करतानाच विमानांबद्दलही माहिती येते. ते लाकडापासून विमान बनवत, पारा हे इंधन वापरत. ते पाणी, जमीन व आकाशातही प्रचलित होईल, अशा विमानांचे वर्णन त्यात आले आहे.
ज्या ग्रंथाबद्दल फारच चर्चा असते ते ‘वैमानिक शास्त्र’ हे पुस्तक तर फार अर्वाचीन, म्हणजे गेल्या शतकातील व तेही राइट बंधूंनी आपले पहिले विमान उडवल्यानंतरचे. हे पुस्तक १९१८ ते १९२३ या काळात दाक्षिणात्य विद्वान सुब्बराया शास्त्री यांनी लिहिले. याच काळात ‘बृहद विमानशास्त्र’ हे पुस्तक ब्रह्ममुनी पारिव्राजक यांनी लिहिले, पण प्रसिद्ध झाले १९५९ मध्ये. 
          सुब्बराया शास्त्रींनी त्यांच्या पुस्तकात दावा केला आहे की, ऋषी भारद्वाजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन देऊन विमानशास्त्राचे ज्ञान दिले. या ग्रंथावर आधारित (कसे ते माहीत नाही. कारण पुस्तकच मुळात फार नंतर लिहिले गेले.) अथवा ऋग्वेदातील काही ऋचांवर आधारित १८९५ मध्ये शिवकर बापू तळपदेंनी ‘मरुत्सखा’ नामक विमान बनवून दादर चौपाटीवर त्याच्या उड्डाणाचे प्रात्यक्षिक सादर केले व त्याला टिळकही उपस्थित होते, असे दावे केले जातात. पण या दाव्याला पुष्टी देईल, असा एकही पुरावा समोर आलेला नाही. 
             इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या (बेंगळुरू) डॉ. एच. एस. मुकुंदा व अन्य ३ शास्त्रज्ञांनी १९७४ मध्ये या ग्रंथांचे अध्ययन करून खालील निरीक्षणे ‘सायंटिफिक ओपिनियन’च्या अंकात नोंदवली आहेत, ती अशी- विमानोड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक ज्ञानशाखांपैकी कशाचेही दर्शन यात दिसून येत नाही. विमानासाठी जी भौमितीक रचना या पुस्तकांत गृहित धरण्यात आली आहे, ती विमान प्रचालनासाठी वापरता येणे अशक्य आहे. शिवाय विमानाची डायमेंशन्स गोंधळाची व वारंवार बदलणारी आहेत. त्यात सातत्य नाही. विमानाचे प्रचालन व नेव्हिगेशन कसे होणार, हेही या पुस्तकांत उल्लेखले गेलेले नाही.
         विमानात पाणी झिरपू नये म्हणून दूधवस्त्र (क्षीरपट) वापरावे, असे सांगितले आहे. विमान बांधणीसाठी ‘रजलोह’ हा धातू वापरावा, असेही सांगितले आहे. दोन्ही ग्रंथ संस्कृतात असले तरी त्यांची भाषा अर्वाचीन आहे. वैदिक संस्कृतशी त्या भाषेचा संबंध नाही. प्रत्यक्ष उड्डाणासाठी विमानाचे वजन जसे हवे त्यापेक्षा हे कितीतरी पट जड असल्याने प्रत्यक्ष प्रयोग करून प्रात्यक्षिक घेता येणार नाही. डायमेंशन्स देताना विती, अंगुली अशी अशास्त्रीय परिमाणे वापरली आहेत. त्यांचा प्रत्यक्ष उपयोग नाही. जे. बी. हेअर म्हणतात की, या दोन्ही पुस्तकांत असे काहीही नाही जे ज्युल्स व्हर्न आपल्या विज्ञानिकांत सांगत नव्हता. एका कल्पनेपलीकडे त्याकडे लक्ष देता येत नाही. या पुस्तकांना विज्ञान म्हणता येणार नाही. ही दोन्ही पुस्तके राइट बंधूंच्या प्रत्यक्ष विमानोड्डाणानंतर लिहिली गेली आहेत. तळपदेंच्या प्रयोगाचे पुरावे उपलब्ध नाहीत.
        ऋग्वेदात विमानशास्त्र आहे हा दावा तर अत्यंत विनोदी या सदरात टाकता येण्यासारखा आहे. ऋग्वेदकालीन वैदिकांना भाजलेल्या विटा माहीत नव्हत्या, कापूस व त्यापासूनची वस्त्रे माहीत नव्हती, लोह माहीत नव्हते, मग बाकी मिस्र धातू माहीत असणे तर दुरची बाब. भारतीयांना विज्ञाननिष्ठ, चिकित्साप्रधान बनवायचे कि मिथकांच्या जाळ्यात अडकवत त्याला कालांधारयुक्त अज्ञानाच्या खाईत लोटायचे? तरुण पिढीने तरी आता या मिथ्या ज्ञानाचे अवडंबर न माजवता खरेच विज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेतली पाहिजे.