कर्मयोगिनी डॉ. शांताबाई दाणी
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 12:45:49

जून २००० मध्ये रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात मी उपशिक्षिका म्हणून रुजू झाले. पहिल्याच दिवशी प्रथमच चैतन्य स्तूप बघितला. क्षणभर थांबले आणि मनात विचार आला, यापूर्वी प्रवेशद्वाराशी असे कधी बघितलेले आठवत नाही. नंतर कळले, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी याठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. शेजारीच रमाकुटी आहे. या कुटीत डॉ. आंबेडकरांचे कपडे, कोट व काठी आदी वस्तू जपून ठेवल्या आहेत. १४ एप्रिल व ६ डिसेंबर या दिवशी सर्वसामान्य जनतेला दर्शनासाठी त्या खुल्या करण्यात येतात. समाजातील असंख्य जनता या चैतन्य स्तूपापुढे नतमस्तक होण्यासाठी येत असते. विद्यालयातील प्रवेशद्वाराजवळून जात असताना आता या स्तूपापुढे नतमस्तक होण्याची रोजचीच सवय झाली आहे. मी देव नाही बघितला; परंतु माणसातील देवाचे मंदिर मी रोजच बघते आणि म्हणूनच रोज त्या महामानवापुढे नतमस्तक होताना अभिमानाने ऊर भरून येतो. या सर्व गोष्टींचे श्रेय संस्थेच्या संस्थापिका सरचिटणीस डॉ. शांताबाई तथा ताईसाहेब दाणी यांना जाते.
कर्मयोगिनी शांताबाई तथा ताईसाहेब दाणी यांची आज (दि. १ जानेवारी) जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा परिचय करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. ताईंचा जन्म १ जानेवारी १९१८ रोजी नाशिक येथील खडकळीतील राजवाड्यात झाला. शांताबाई या धनाजी दाणी आणि फुंदाबाई दाणी यांचे दुसरे कन्यारत्न. लहानपणापासूनच त्या हुशार आणि चुणचुणीत होत्या. आपल्या मुलीने शिक्षण घ्यावे, असे वडील धनाजी दाणी यांना सतत वाटत असे. ताई अतिशय कष्टाळू होत्या. अजूनही मला ताईंचा १ जानेवारी २००१ चा वाढदिवस आठवतो. नेहमीप्रमाणे देणगीदारांनी विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी गणवेश आणले होते. गणवेश वाटपाचे काम त्यांच्या हस्ते चालू होते. ताई प्रत्येक विद्यार्थिनीला नाव विचारत आणि तो गणवेश त्याच मुलीला मिळतो की नाही, याची खात्री करून घेत. हा त्यांचा स्वभाव मला तर खूपच आवडला. ताई फार प्रामाणिक होत्या. एकदा तर त्यांनी सिनेमाला गेलेले असताना त्यांना सापडलेली सोन्याची बिंदी टॉकीजच्या मालकाला प्रामाणिकपणे परत केली.
शांताबाईंच्या आई खूप स्वाभिमानी होत्या. आपल्या आईचा गुण त्यांनी घेतला होता. शिक्षण घेतले, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे, समाजातील लाखो स्त्रियांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भक्कम असा पाया रचला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्र या संस्थेची स्थापना केली. रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, तक्षशिला विद्यालय आणि कुणाल प्राथमिक विद्यालय या शैक्षणिक संस्थांची ताईंनी स्थापना केली. आजपर्यंत लाखो विद्यार्थिनी या शाळांमधून शिक्षण घेऊन बाहेर पडल्या आहेत.
धनगर गल्लीतील दाणी मास्तरांनी शांताताईंना पुण्याला ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. त्यानंतर ताई विंचूर येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. देवळात प्रवेश केला म्हणून त्यांना गावातून तंबी देण्यात आली. त्याच काळात ताईंच्या आई आजारी पडल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. आपल्या आईची सेवा करत असताना दवाखान्यातच डॉ. लोंढेबाईंशी ओळख झाली. डॉ. लोंढेबाईंनी शांताताईंच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. मॅट्रिकचे पेपर सुरू असताना आई गेली. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सारे जग उद्धारी' या उक्तीला साजेशी अशी त्यांची आई ताईंना सोडून गेली. आईच्या हट्टामुळेच ताई पुढे शिक्षण घेऊ शकल्या.
पुढे एचपीटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. १९४२ मध्ये महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. हाच तो दिवस ताईंच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. बाबासाहेबांच्या भाषणाने प्रभावित होऊन समाजसेवेचा वसा घेण्याचे त्यांनी ठरवले. दादासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ताईंनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. त्या काळात ताई सायकलवर प्रवास करत. पुढे ४५ वर्षे ताईंचा प्रवास सायकलवरच होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर दादासाहेबांच्या आशीर्वादाने त्यांना मानसन्मान मिळत होता. त्यांच्या प्रेरणेने किस्मत बागेत केवळ वीस मुलींना प्रवेश देऊन रमाबाई आंबेडकर कन्या छात्रालय सुरू करण्यात आले.
समाजातील ग्रामीण भागातील मुलींना या वसतिगृहात प्रवेश देण्यात येऊ लागला. ताई अतिशय शिस्तप्रिय होत्या. त्यांची राहणी साधी होती. डॉ. लोंढेंनी ताईंना एकदा सोन्याची बांगडी दिली होती. दादासाहेब गायकवाड यांनी ज्यावेळी वसतिगृह सुरू केले त्यावेळी ताईंनी ती बांगडी त्यांना मदत म्हणून दिली. ताईंचा आणि ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त वि. वा. शिरवाडकर यांचा फार जवळचा स्नेह होता. तात्यासाहेब वर्षभरातून एकदा तरी कार्यक्रम घेऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असत. आमदार झाल्यानंतरदेखील ताईसाहेब सायकलवर फिरत असत. ताईंनी शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून दिले. दादासाहेबांच्या मृत्यूनंतर ताईंनी राजकारणातून आपले अंग काढून घेतले. पुढे अखेरपर्यंत शैक्षणिक कार्यातच स्वतःला झोकून दिले. मुक्त विद्यापीठातर्फे 'डॉक्टर ऑफ लिटरेचर' ही पदवी ताईंना राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ताईंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपतींच्या हस्ते जागतिक मराठी परिषदेत १९९४ मध्ये ताईंना गौरविले. प्रत्येक पुरस्काराच्या वेळेस मिळणारी रक्कम ताई समाजकार्यासाठी वापरत असत.
डॉ. आंबेडकरांच्या खाणीतील पद्मश्री दादासाहेब गायकवाड व कर्मयोगिनी ताईसाहेब दाणी ही दोन रत्नेच समाजाला प्रकाश देणारी ठरली. ९ ऑगस्ट २००३ रोजी डॉ. ताईसाहेब नावाचे वादळ शांत झाले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पद्मश्री दादासाहेब गायकवाड आणि कर्मयोगिनी ताईसाहेब दाणी यांचे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. अशा या कर्मयोगिनीला रमाई, तक्षशिला, कुणाल आणि आमचे नवीनच लावलेले रोपटे उच्च माध्यमिक विद्यालय या सर्वांच्या वतीने ताईंच्या स्मृतीस कोटी कोटी प्रणाम!
- कीर्ती पाटील-कदम (लेखिका रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात उपशिक्षिका आहेत.)