वाचन संकल्प महाराष्ट्राचा

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 12:51:32

चौदा ते बावीस डिसेंबर या कालावधीत पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात नॅशनल बुक ट्रस्टतर्फे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले होते. या वर्षाचे विशेष म्हणजे, मागील वर्षापेक्षा लोकांचा उत्साही सहभाग, पुस्तकांची झालेली विक्री आणि साहित्यविषयक कार्यक्रमांचे प्रमाण तिप्पट होते. गेल्यावर्षी साधारणपणे अडीच ते तीन लाख लोकांनी या साहित्य, वाचक महोत्सवात भेट देऊन जवळपास नऊ ते दहा कोटींची पुस्तक विक्री झाली होती. यावर्षी विक्रमी पुस्तक विक्री झाली. तसेच अनेक लेखकांनी येथे उपस्थिती लावली. जवळपास दहा ते बारा लाख लोक या महोत्सवात भेट देऊन गेले आणि ३५ कोटींवर पुस्तक विक्री झाल्याचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. याचाच अर्थ असा की, गेल्या वर्षापेक्षा तिप्पट ते चौपटीने यंदा प्रतिसाद होता. यात पन्नास टक्के तरुण, तर पंचवीस टक्के लहान मुले सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी हेसुद्धा सहभागी होते आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पुस्तक खरेदी केली. ज्येष्ठ नागरिकांचाही यात मोठ्या प्रमाणात सहभाग होता. प्रकाशकांनी जवळपास सातशे स्टॉल लावले होते. यात नुसती पुस्तक विक्री नाही, तर साहित्यिक कार्यक्रम, चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम व लेखकांचा सहभाग, लहान मुलांसाठीची पुस्तके अशा सर्वच गोष्टींवर भर होता. या महोत्सवात शंभराच्या जवळपास पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर नृत्य, नाटक आणि संगीतमय कार्यक्रमही आयोजित केले होते. साहित्य आणि संस्कृतीचा मिलाफ या कार्यक्रमात होता.
     एकंदरीत दिसून आले की, अजूनही पुस्तक खरेदी करून वाचण्याची वाचकाची वृत्ती आहे, पण त्यासाठी पुस्तके आणि वाचक हे एकमेकांजवळ यायला हवेत हेही तेवढेच महत्त्वाचे आहे, हे यातून प्रामुख्याने समोर आलेले आहे. आणि हा जवळपास नेहमीचा अनुभव आहे की, ज्यावेळी अशा प्रकारे वाचक आणि पुस्तके जवळ येतात त्यावेळेला अशा प्रकारच्या गोष्टी घडून येतात. त्यासाठी अशा पुस्तक महोत्सवाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक, विज्ञानविषयक, स्पर्धा परीक्षा, चरित्र, आत्मचरित्र, बाल साहित्य, पाककृती, दिवाळी अंक अशा सर्व प्रकारच्या ग्रंथांचा यात समावेश होता. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी शासनातर्फे जाहीर करण्यात आले होते की, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव ‘भिलार’च्या धर्तीवर एक पुस्तकाचे गाव वसविण्यात येईल. अद्यापपर्यंत त्याची काही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्या बाबतीतही विचार होणे गरजेचे आहे. नवीन काही उपक्रम जाहीर करताना याआधी जे काही उपक्रम जाहीर केले होते त्यांची पूर्तता झाली आहे का नाही? हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे. नाही तर एक सरकार जाहीर करते नंतरचे येणारे त्याकडे दुर्लक्ष करतात असे व्हायला नको. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात बगीच्यात वाचनासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत, तर नाशिक येथे रिलॅक्स कॉर्नर रेस्टॉरंटमध्ये वाचकांसाठी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. अशा ठिकाणीसुद्धा वाचक पर्यटक भेट देत असतात. नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम राबवला जातो. दरवर्षी दिवाळीमध्ये निरनिराळे विशेष विषय घेऊन दिवाळी अंक काढले जातात. पुण्यामध्ये ‘चपराक’सारखा दिवाळी अंक वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यात वाचनीय लेख असतात. यावर्षी चपराकच्या दिवाळी अंकाने वितरणाचा उच्चांक गाठला आहे. एक लाख तीन हजार अंकांपर्यंत त्याचे वितरण झालेले आहे. त्याचबरोबर मराठवाड्यात नांदेड येथून निघणारा ‘उद्याचा मराठवाडा’, मुंबईमधून निघणारा ‘ऋतुरंग’, ‘अक्षरगंध’सारखा दिवाळी अंक, पुण्याहून ‘अक्षर लिपी’, ‘पुण्यभूषण’ अंक नवीन काही देत असतात. कथा, कादंबऱ्या हे तर नेहमीचे विषय आहेत. परंतु नवीन काही वाचायला मिळत असल्यास वाचकांचा तिकडे ओढा असतो. 
          पुण्यातील वाचक महोत्सवाचे यश लक्षात घेता आता त्याचबरोबर कोल्हापूर, नागपूर, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर किंवा नाशिक अशा ठिकाणी अशा प्रकारे नॅशनल बुक ट्रस्टतर्फे पुस्तक महोत्सव आयोजित केले गेले तर खूपच चांगली गोष्ट होईल व प्रत्येक जिल्ह्यातच असे पुस्तक महोत्सव सुरू करावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी राज्य सरकारने नववर्षाची सुरुवात वाचनाने व्हावी या दृष्टीने ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. दि.१ ते १५ जानेवारी २०२५ या काळात राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये, सार्वजनिक वाचनालये या ठिकाणी या वाचन पंधरवड्याचे आयोजन केले जाणार आहे. नवीन वर्ष २०२५पासूनच याची सुरुवात होणार आहे. संस्कारक्षम वयात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होण्यासाठी वाचनामुळे संस्कार होत असतात. परंतु अलीकडे बऱ्याच प्रमाणात तरुण वाचनापासून दुरावला आहे. त्यासाठीचा हा संकल्प आहे. यासाठी शासकीय पातळीवर  जिल्हा आणि महाविद्यालय स्तरावर समित्या नेमल्या जाणार आहेत आणि या उपक्रमाविषयी सूचना ही देण्यात आली आहे, असे म्हटले आहे.
        या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षकांनी पुस्तकाचे सामूहिक वाचन करणे. पुस्तक कसे वाचावे? कोणती पुस्तके वाचावीत? याबाबत कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे. स्थानिक लेखकांना महाविद्यालयामध्ये निमंत्रित करून त्यांच्यासोबत संवाद घडवून आणणे. विद्यार्थ्यांना पुस्तक वाचायला देऊन, त्याचे परीक्षण करून कथन करायला लावणे. अशा प्रकारे उपक्रमांची योजना करून वाचनाविषयी गोडी वाढवणे, यासाठी हा संकल्प केलेला आहे. केलेला हा संकल्प पूर्णत्वाला जाणे हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकांचे गाव या योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे. या योजनेसाठी पर्यटनस्थळ, ऐतिहासिक स्थळ, कृषी पर्यटन, निसर्ग संपन्न, स्वच्छ व शांत वातावरण आणि वाचन संस्कृती असलेल्या गावांची निवड केली जावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना या गावांची निवड करण्याचे अधिकार दिले आहेत. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेंतर्गत कोकण महसूल विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची ‘पुस्तकाचे गाव’साठी निवड करण्यात आली आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म ठिकाण म्हणून हे गाव परिचित आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध याची पुस्तकाचे गावसाठी निवड केली आहे. नवेगाव बांध हेसुद्धा विदर्भातील पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे. परंतु अजूनही इतर गावांची निवड झाल्याचे जाहीर झाले नाही. तसेच जिल्हानिहाय गावाची निवड झालेली नसल्याचे दिसते. झाली असल्यास तसे जाहीर करावे. असे गाव पुस्तकाचे गाव म्हणून पुढे यावे, केवळ पर्यटनस्थळ म्हणून नसावे याबाबतीतही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुस्तकाचे गाव योजनेचा विस्तार करण्यासंदर्भात १५ डिसेंबर २०२१ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होऊन ४ जानेवारी २०२२ला शासन निर्णय जारी झाला आहे. या योजनेच्या विस्तारासाठी येणाऱ्या वार्षिक खर्चासही मान्यता देण्यात आली असून, निधीस मंजुरी देण्यात आली आहे. पण अद्याप दोन वर्षे उलटून गेली तरी पुस्तकाचे गाव अस्तित्वात आले नाही. आणि जर असे गाव अस्तित्वात आले असेल तर त्याचा परिचय माध्यमांद्वारे करून दिला पाहिजे. या नववर्षात जिल्हानिहाय पुस्तकाचे गाव, तसेच पुणे पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात यावे. आणि आता नुकतीच उच्च तंत्र शिक्षण विभागाने १ ते १५ जानेवारी या काळात वाचन वृद्धीसाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाचा  केलेला संकल्प पूर्णत्वास जावा ही अपेक्षा सगळ्यांचीच आहे. शांतता! पुणेकर पुस्तक वाचत आहेत. अशाच प्रकारे, शांतता! महाराष्ट्र पुस्तक वाचत आहे, असा उपक्रम नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे तसेच मुख्यमंत्र्यांनी राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली, तीसुद्धा पूर्णत्वास जावी आणि साहित्य व संस्कृती संवर्धनासाठी व्यापक प्रमाणात ही वाचक चळवळ म्हणून पुढे यावी. 

-दिलीप देशपांडे ( ८९९९५६६९१७ )