विषमतेची बीजे नष्ट करण्याचा मार्ग शिक्षणच
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 12:58:51

समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर विषमता अधोरेखित होते आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जगभरामध्येच आर्थिक दारिद्र्यात असलेली माणसांची संख्या जशी वाढते आहे, त्या प्रमाणात श्रीमंतीचा आलेख ही वाढताना दिसत आहे. ही विषमता समाजामध्ये संघर्षाला बळ देत असते. कोणताही संघर्ष हा नेहमीच विनाशाकडे घेऊन जाणारा असतो. त्यामुळे समाजाला एकात्मिक दृष्टीने पुढे घेऊन जायचे असेल आणि राष्ट्राला प्रगतीची पावले टाकायचे असतील तर विषमतेचा आलेख कमी करण्याची गरज आहे. समाजात जोपर्यंत विषमता ठासून भरली असते, तोपर्यंत निकोप समाज म्हणून अस्तित्वात येणे कठीण असते. अन्यथा सारा प्रवास गर्दीचा ठरण्याची शक्यता आहे.
समाजात विषमता नष्ट करण्याचे अनेक मार्ग आहेत. मात्र त्यातील सर्वांत प्रभावी मार्ग शिक्षण हा आहे. दुर्दैवाने शिक्षणाची प्रक्रियासुद्धा वेगाने पुढे घेऊन जाण्यासाठी विषमता हाच मोठा अडथळा ठरत आहे. शिक्षणाची अपेक्षित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि समान उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी अपेक्षित असलेल्या शैक्षणिक संधी सर्व स्तरांवर समान पातळीवर उपलब्ध होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाताना दिसत आहेत. हे विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे शिक्षणातील विषमता हे आहे. त्यामुळे आपल्याला सामाजिक न्यायाच्या दिशेने पावले टाकायचे असतील तर शिक्षणाने त्या दृष्टीने विचार करायला हवा. शिक्षणातूनच विषमतेची बीजे नष्ट करण्यासाठीची पावले टाकली जाऊ शकतात. तसे घडले तर माणसांच्या गर्दीला समाज म्हणून अस्तित्वात येण्याची अधिक संधी आहे. अन्यथा माणसांची गर्दी हेच वास्तवाचे चित्र भविष्यातही कायम राहाण्याचा धोका आहे.
आजवर देशामध्ये आलेले विविध आयोग आणि शिक्षण धोरणांनीदेखील यासंदर्भात महत्त्वाची भूमिका प्रतिपादित केलेली आहे. शिक्षण नेहमीच समाजाच्या विकासात जे काही अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी भूमिका घेत असते. ज्यामुळे समाजाची उन्नती होणार आहे, अशा गोष्टींची पेरणी करण्यासाठी शिक्षणातून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतो. चौतीस वर्षांत अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये यासंदर्भात भूमिका मांडण्यात आली आहे. ती भूमिकासुद्धा अधिक दखलपात्र ठरते. राष्ट्रीय शिक्षण धोरणात म्हटले आहे की, सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण हे एक आवश्यक उद्दिष्ट आहे, शिवाय सर्वसमावेशक आणि न्याय्य समाजाची स्थापना करण्यासाठी ते महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला स्वप्न पाहण्याची, शिकण्याची, प्रगती करण्याची आणि योगदान देण्याची संधी आहे. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याप्रमाणे त्याला हव्या त्या पद्धतीने स्वतःच्या प्रगतीसाठी स्वप्न पाहण्याची संधी उपलब्ध आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला, मला काय व्हायचे आहे? कोणत्या क्षेत्रात जायचे आहे? कसे जायचे आहे? या दृष्टीने तो आपले स्वप्न निश्चित पाहू शकतो. त्याचबरोबर त्या दृष्टीने झेप घेण्यासाठी आवश्यक असलेल्या शिक्षणाची पाऊलवाट चालण्यासाठी तो निश्चित प्रयत्न करू शकतो. प्रत्येकाला स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. त्या दृष्टीने समान शिक्षणाची संधी आहे. त्याप्रमाणे आवडीच्या शिक्षणाच्या क्षेत्रात संधी प्राप्त करून देण्याचा विचारही करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर प्रगती करण्याचा विचारही मांडण्यात आलेला आहे. माणसाला प्रगती करण्यासाठी स्वप्न पडावे लागतात. आणि त्या स्वप्नाची परिपूर्ती करण्यासाठी माणसाला शिकावे लागते. त्याशिवाय माणूस यशाचे शिखर पादाक्रांत करू शकत नाही. हे यशाचे शिखर गाठण्यासाठी कोणत्याही समाजातील, कोणत्याही धर्मातील, कोणत्याही पंथातील, जातीतील माणूस त्या दिशेने प्रवास करू शकतो. त्यामुळे त्या दिशेचा प्रवास करत प्रगतीची पाऊलवाट चालण्याचे स्वातंत्र्य सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरते.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये सामाजिक न्यायाच्या दृष्टीने काही भूमिका प्रतिपादित करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीचे धोरणात काही उद्दिष्टे राखण्यात आलेली आहेत. हे धोरण असे म्हणते की, आपल्याला एक अशी शिक्षणप्रणाली तयार करायची आहे, ज्यात जन्मतः कोणतीही परिस्थिती किंवा पार्श्वभूमी असलेल्या भारतातील सर्व मुलांना शिकण्याची आणि उत्कृष्ट कामगिरी करण्याची समान संधी मिळेल. हा विचार अत्यंत मूलभूत स्वरूपाचा आहे. खरेतर परिस्थिती कोणत्याही स्वरूपाची असली, तरीसुद्धा शिक्षणाच्या पाऊलवाटेने चालताना त्याला ज्या दिशेने प्रवास करायचा आहे, त्या दिशेचा प्रवास करण्याचे स्वातंत्र्य घेता येईल. दुर्दैवाने आज आपल्या समाजामध्ये आर्थिक परिस्थितीच्या अभावी अनेकांना स्वतःची इच्छा असूनही त्याप्रमाणे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होत नाही. गेल्या काही वर्षांत शिक्षणाची प्रक्रिया प्रचंड वेगाने महाग होते आहे. शिक्षणाचे वाढते खासगीकरण महागाईला जन्म देते आहे.
शिक्षण हे समाजविकासाचे साधन आहे. या मूलभूत असलेल्या विचारात बदल होत असून, अलीकडे शिक्षण हे नफ्याचे माध्यम ठरू लागले आहे. अशा स्वरूपात त्याचा विचार होऊ लागल्याने समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. आर्थिक परिस्थितीमुळे समाजात विषमता निर्माण होत आहे. मात्र दुर्दैवाने त्या विषयांचा फटका शिक्षणाच्या प्रक्रियेला बसत आहे. गरिबांसाठी वेगळी महाविद्यालये आणि अतिउच्च श्रीमंतांसाठी वेगळी महाविद्यालये. ही विषमता शिक्षणाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. हे वर्तमानातील वास्तव आपण नाकारू शकणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये या संदर्भातला विचार प्रतिपादित करताना अत्यंत चांगली भूमिका घेण्यात आली आहे. मात्र दुर्दैवाने ती वाट वास्तवात आणणे हे कष्टाचे व जिकिरीचे काम ठरणार आहे.
व्यापक अर्थाने विचार केल्यास असमानता ही सर्व टप्प्यांवर सर्वसमावेशक आणि न्याय्य शिक्षण मिळविण्याच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण करते. विषमतेचा परिणाम शिक्षणावर आणि माणसाच्या विकासावर विविध अंगांनी होत असतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे विद्यार्थी शाळा सोडतात किंवा ज्यांचे शिक्षण थांबते असे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील असतात. या गटांपैकी बऱ्याच लोकांना पुरेसे पाठबळ, पोषण, शिक्षण संसाधनाचा अभाव, विविध प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक संकटांमुळे अपेक्षित अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी, तसेच त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आर्थिक परिस्थिती उत्तम नसेल तर कुपोषणाचा बळी ठरण्याची शक्यता अधिक आहे. कुपोषण असलेली व्यक्ती शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अपेक्षित संपादणूक प्राप्त करण्यासाठी फारसा यशस्वी होऊ शकत नाही. शिक्षणामध्ये आरोग्य हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उत्तम आरोग्य हवे असेल तर परिस्थिती किमान सकस आहार देऊ शकेलइतकी चांगली असायला हवी. दुर्दैवाने आर्थिक विषमतेमुळे समाजातील अनेक बालके हे कुपोषित आहेत. कुपोषित बालक शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी होत असले तरी त्याच्या शिकण्यावर विपरीत परिणाम होत असल्याची बाब अनेक सर्वेक्षणातून समोर आली आहे. म्हणजे एका अर्थाने विषमता विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर लोटण्यास मदत करणारी ठरते. एका अर्थाने समाजातील वंचित घटक हाच विषमतेचा पहिला बळी ठरतो.
-संदीप वाकचौरे