मनाच्या मर्यादा अन् सुखाचा उंबरठा

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 13:00:34

काही वेळा जीवनात असे प्रसंग येतात जेव्हा मनाला असा भास होतो की, सुख मनाच्या उंबरठ्यावर येऊन परत जाते. खरंतर सुख म्हणजे काय, हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याचा आनंद कसा घ्यायचा हेही कळत नाही. माणूस भौतिक वस्तूंमधून सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, जे त्याला कधीच मिळत नाही. सुख मिळविण्यासाठी अशा वस्तू प्राप्त कराव्यात ज्यातून आत्मिक समाधान तर मिळेलच. याव्यतिरिक्त एक परिपूर्ण जीवन जगण्याची वाट मिळेल. जीवन जगण्याच्या शर्यतीत प्रत्येक जण धावत आहे. प्रत्येकाची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी वेगवेगळी असू शकते. कुणी भरमसाट पैसा, उच्च राहणीमान आणि यातून मिळणारी प्रतिष्ठा याला सफल जीवन मानत असेल, तर कुणी उदरनिर्वाह भागण्यापुरता पैसा, साधे राहणीमान व उच्च प्रतीची मानसिक अवस्था, ज्या मनात सर्वांविषयी प्रेम असेल, नम्रभाव ठेवून जगाला आपलंसं करण्याची ओढ व माणुसकीचे जिवंत उदाहरण म्हणून जीवन जगण्याची इच्छा असेल तोच सफल जीवन जगू शकतो. 
          संतांनी कधीच धन-वैभव याला संपत्ती म्हणून संबोधले नाही, तर मानवता, परोपकार, सद्गुण आणि सदविचार यांना जीवनाची खरी संपत्ती म्हणून पाहिले आणि आपल्या उपदेशातून जगाला सांगितले आहे. हा अमूल्य ठेवा ज्याच्या ठायी असेल तोच खऱ्या अर्थाने सुखी आहे, असे म्हणता येईल. घर, परिवार, नाते व मित्र हे जपण्यासाठी खूप खर्च नसतो. फक्त प्रेम व विश्वास हे यांना सतत जिवंत ठेवतात. हे ज्यांच्याकडे भरभरून आहे ते कधीच खचून जात नाहीत.
        जगात वावरताना काहीअंशी अवलिया माणसे भेटतात, ज्यांना कसलीही परिस्थिती डगमगवू शकत नाही. जीवन जगत असताना आपल्या ज्या प्राथमिकता ठरवून दिलेल्या आहेत अन्न, वस्त्र व निवारा; परंतु यासोबतच सद्यःपरिस्थितीत यात सदविचार आणि सद्गुण हेही जोडण्याची गरज असल्याचे जाणवते. केवळ अन्न, वस्त्र व निवारा असल्याने माणूस परिपूर्ण होत नाही. अन्न केवळ पोट भरण्याचे काम करते, पण संत उपदेश संकुचित मनाची पोकळी भरण्याचे काम करतात. केवळ अंगभर वस्त्र असल्याने माणूस सुंदर दिसत नाही, तर मनी प्रेमभाव आणि नम्रता असेल तरच माणूस खऱ्या अर्थाने माणूस म्हणून शोभून दिसतो. केवळ डोक्यावर छत असलं म्हणजे निवारा आहे असे म्हणता येणार नाही. ज्याच्या डोक्यावर सदैव वडीलधाऱ्या मंडळींचे शुभाशीर्वाद व संतांचा हात असेल त्याच्या ठायी खरा निवारा आहे. त्याच वास्तूमध्ये परमसुख निनादत असते. 
         सुखाचा लोभ आणि दुःखाचा शीण ज्याला विचलित करू शकत नाही तोच खरा समाधानी म्हणता येईल. अनेक वेळा आपणच आपल्या विचारांना आणि मानसिक अवस्थेला एक मर्यादा लावून देतो. सुखी होण्यासाठी आपण अमर्याद प्रयत्न करत राहतो, परंतु सतत पडलेला चेहरा, भविष्याचा विचार करून चिंतेत राहणे आणि ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या बदलण्याचा निरर्थक अट्टाहास करत राहणे यातून मिळते केवळ नैराश्य. नैराश्याला कसलीच मर्यादा नसते. कधीकधी असे नैराश्य माणसाला जीवन संपवायला भाग पाडते. सकारात्मक विचारसरणी समृद्ध करून जीवन जगण्यात जो आनंद आहे त्याला तोड नाही. जीवनात पावलोपावली संघर्ष आहे. विजेता व पराजित क्षणाक्षणाला बदलत राहतात. काही कमावल्याचा थोडा आनंद व गमावल्याचे अफाट दुःख झोळीत भरून आपला जीवनप्रवास निरंतर सुरूच राहतो. जशी एखादी गुणगुण करणारी माशी उच्च प्रतीचे मिष्टान्न सोडून जखमेभोवती फिरत राहते त्याप्रमाणे माणूस हा प्राणीसुद्धा असीम सुखाचे साधन सोडून असाध्य इच्छा व आकांशा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आयुष्यभर झुरत राहतो. 
           भगवान बुद्ध म्हणतात, इच्छा ह्याच दुःखाचं मूळ कारण आहे. बरं माणसाची कुवत असेलही इच्छा साध्य करण्याची, पण त्यालाही काही मर्यादा असतातच ना! प्रत्येक पूर्ण झालेली इच्छा ही नव्या इच्छेला जन्म देते आणि हा ऊन-सावलीचा खेळ आयुष्यभर संपत नाही. जे प्राप्त आहे त्याचा आनंद घेण्याऐवजी माणूस नसलेल्या वस्तूंच्या दुःखाने तीळतीळ मरत जातो. असा जगतो जसा कधी जन्मलाच नाही आणि असा मरतो जसा कधी जगलाच नाही. असामान्य माणसे कधीच नकारात्मक भूमिका घेऊन जगत नाहीत. कारण त्यांना एकाच अप्राप्त गोष्टीला धरून बसण्याची सवय नसते. ते रोज नवी आव्हाने झेलत आपले जीवन व्यतीत करतात. आपण जर थोडा प्रयत्न केला तर एक समाधानी जीवन जगण्याची संधी रोज मिळते. गरज आहे फक्त आपणच लावलेल्या संकुचित विचाराच्या मर्यादा लांघून उज्ज्वल भवितव्याचा विचार करण्याचा. अमर्यादित आनंद घेण्यासाठी अमर्यादित प्रयत्नही करावे लागतील. विशाल सागराच्या लाटा कितीही वेगाने धावून आल्या तरी किनाऱ्यावर येऊन माघारी फिरतात तसंच मनाचा मोह कितीही वाढला तरीही त्याला एक मर्यादा लावून दिली की, त्याला अहंकार होणार नाही. शेवटी सांगण्याचा उद्देश एवढाच की, आपण लावलेल्या मर्यादा आपणच मोडू शकतो. मग त्या समाधानी राहण्यासाठी मोडायच्या की दुःखी होण्यासाठी तेही आपणच ठरवावे. कारण आपल्या जीवनाची दिशा जेव्हा आपणच ठरवतो तेव्हा अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीतून आपण अमर्यादित आनंद प्राप्त करू शकतो. प्रेमातून कमावलेली माणसे हीच खरी संपत्ती असते.

-पवन कुसुंदल