मास्टर दीनानाथ मंगेशकर : शतकातील महान गायक
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 13:52:41
प्रत्येक शतकात काही महान आत्म्ये मनुष्य स्वरूपात पृथ्वीतलावर येतात आणि नक्षत्रांचे देणे मानवाचे आयुष्य सुंदर व यथार्थ करण्यासाठी प्रत्यक्षात देऊन जातात. काही महान मनुष्य अल्पायुष्यात अल्पावधीतच हिमालयासारखे उत्तुंग आयुष्य जगतात. त्यांच्या त्या जगण्याच्या पद्धतीचा विचार करता आपण चकित होऊन जातो. कारण अवघ्या दोन दशकांच्या कालावधीत शतकानुशतके आठवण राहील असे कार्य त्यांनी केलेले असते. आज आपण काही स्मृतीशृखलांनी गेल्या शतकातील महान गायक, नट, संगीतकार मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना आदरांजली वाहणार आहोत.
आज (दि. २९) डिसेंबर, मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची १२३वी जयंती आहे. कालच मी मानापमान या नाटकाची तसेच चित्रपटाचीही जाहिरात बघितली आणि मास्टर दीनानाथ मंगेशकरांची तीव्रतेने आठवण झाली. कारण, या नाटकवेड्या माणसाने केवळ नाटकांत अभिनय केला नव्हता किंवा नट म्हणून ते प्रसिद्धीस पावले नव्हते, तर ते बंडखोर संगीतकार म्हणून लोकांच्या स्मरणात जास्त राहीले. कारण, प्रस्थापित नाट्यसंगीतात बदल करून त्याच काळात, वयाने लहान असतानाही, वयाने मोठ्या आणि समाजमान्य संगीतकारांच्या चाली बदलून त्या गाजवून दाखवण्याचे धाडस त्यांनी केले होते. आपण एक उत्कृष्ट संगीतकार आहोत हे आत्मविश्वासाने त्यांनी सिद्ध केले होते. बलवंत संगीत मंडळी या नाटक कंपनीची स्थापना केल्यानंतर मास्टर दीनानाथ स्वतः संगीत मानापमान या नाटकात धैर्यधराची भूमिका करायचे. या नाटकातील चाली आज शंभर वर्षांनंतरही टिकून आहेत. त्याकाळी संगीत मानपमान या नाटकाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता.
मास्टर दीनानाथांचा जीवनपट थोडक्यात सांगायचा तर, गोमंतकाच्या देखण्या परिसरातील जागृत दैवत श्री मंगेशाच्या माथ्यावरील पवित्र टवटवीत बिल्वपत्र म्हणजे मास्टर दीनानाथ! गोमंतक ही खरेतर हिंदूंची देवभूमी आहे. इथली देवालये, मंदिरांचे स्वरूप नास्तिक माणसालाही आस्तिक बनवते. मला आठवते, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी ‘गोमंतक’ म्हणून तत्कालीन काव्य रचले होते. त्यातील या ओळी म्हणजे खरी गोमंतकाची ओळख.
तुरष्कीय नेणे नाना देवता पळता दुरी ।
श्रीमंगेश आणि शांता भवनीच टिके घरी।।
श्रीमंगेशास अभिषेक करणाऱ्या पुजाऱ्यांच्या घरी अभिषेकी घराण्यात दीनानाथांचा जन्म झाला. गणेश अभिषेकी हे श्रीमंगेशाचे प्रमुख उपाध्ये, ते दीनानाथांचे वडील होते. २९ डिसेंबर १९०० या दिवशी मंगेशी येथेच दीनानाथाचा जन्म झाला होता. गौर अंगकांती, मोहक मुद्रा, हरणासारखे चंचल नेत्र, विशाल भालप्रदेश, कुरळे केस, उंच, सडपातळ नाजूक बांधा या सौंदर्याला साजेसा असा गोड आवाज, धीट, हजरजबाबी, बुद्धीने तल्लख असा अत्यंत देखणा बालक सर्वांना हवाहवासा वाटे. गाण्याची आवड आणि चमत्कार वाटावा असा असाधारण गळा उपजतच होता. स्वरस्थाने जन्मताच पक्की आणि म्हणण्यात एक स्वाभाविक फेक होती. निसर्गाने त्यांना प्रथमपासूनच विलक्षण गतिमान फितरत बहाल केलेली होती. ते एकपाठी होते. दीनानाथांना चढा, सुरेल, भिंगरीसारखा फिरत असलेला गोड आवाज ईश्वरदत्त लाभला असल्यामुळे अतिशय लहानवयातच त्यांनी पदे म्हणून दाखवण्याचा उपक्रम आरंभला होता. त्यांचा एक किस्सा फार प्रसिद्ध आहे. ते तरुण वयात हळूहळू प्रसिद्धीस प्राप्त होऊ लागले, तेंव्हा कुणी त्यांना म्हणत असे, “अरे दीना, तू नारायणराव बालगंधर्वांची पदे म्हणत जा, लोकांना ती खूप आवडतात. तुझे त्यामुळे जास्त नाव होईल.” तेव्हा त्या बालवयातही दीनानाथ त्यास म्हणाले, “मला प्रसिद्धी मिळेल ती गंधर्वांची पदे चांगली गातो म्हणून, पण मला तसं नकोय; मला कुणाचीही नक्कल करायची नाही. मला माझं स्वतःचं गाणं गायचं आहे.” आणि पुढे संगीतात महान इतिहास घडला. मास्टर दीनानाथांनी बलवंत संगीत मंडळीची निर्मिती केली. नाट्य संस्थेची बलशाली वाटचाल सुरू झाली. कृष्णराव कोल्हापुरे, मास्टर दीनानाथ आणि चिंतामणराव कोल्हटकर हे त्रिमूर्ती या कंपनीचे मालक होते. संगीत शाकुंतल, काँटों में फुल, धरण का चाँद ही उर्दू नाटके, जन्मरहस्य, वीर विडंबन, भावबंधन, राजलक्ष्मी, उग्रमंगल, राजसंन्यास, वेड्यांचा बाजार, चांदणे रत्न, संगीत रणदुंदुभी, संगीत देशकंटक, संगीत सन्यस्तखड्ग, संगीत ब्रह्मकुमारी, ताज-ए-वफा, मानपमान ही त्यांची त्या काळात गाजलेली नाटके होती. नाचत ना गगनात नाथा, कठीण कठीण कठीण किती, सकल चराचरी या तुझा असे निवास, आपदा राजपदा भयदा, वितरी प्रखए तेजोवल, जगी हा खास वेड्यांचा, परवशता पाश दैवे, दिव्य स्वातंत्र्य रवी, मर्मबंधातली ठेव ही, रतीरंगे रंगे ध्यान, सुकतातची जगी या, मधुमिलनात या, चंद्रिका ही जणू, दे आता शरणागता, शूरा मी वंदिले, रवी मी हा चंद्र असे धरिला, भाली चंद्र असे धरिता, प्रेम सेवा शरण आणि युवती मना दारुण त्यांनी संगीतबद्ध केलेल्या या आणि अशा अनेक नाट्य गीतांनी त्याकाळी रसिकांना वेड लावले होते. संगीत रंगभूमीवरील मास्टर दीनानाथांचे योगदान हे असाधारण आहे. त्यांनी नाट्यसंगीत, गाण्याची स्वतःची शैली प्रस्थापित केली. जी आजतागायत तरुण पिढीचे गायक आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. पुढेही हे संगीत अनंतकाळ टिकणार आहे यात मुळीच शंका नाही.
मास्टर दीनानाथांची या भारतवर्षाला सर्वांत मोठी देणं म्हणजे त्यांचे पंचप्राण असलेले त्यांचे पंचसूर, जे भारतरत्न लतादीदी, आशाताई, उषाताई, मीनाताई आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या रूपांत या जगात आले आणि दीनानाथी संगीतास त्रिखंडात गाजवले. पं. हृदयनाथांनी तर दीनानाथांच्या अनेक शास्रीय बंदीशी, चीजा, नाट्यगीतांच्या चाली घेऊन नवीन गाणी त्यात बांधली. कारण, वडील दीनानाथांकडून त्यांना जी विरासत मिळाली ती हीच संगीताची! गगन सदन तेजोमय ही प्रार्थना, मैं एक सदीसे बैठी हूँ.. हे विरह गीत किंवा मी मज हरपून बसले गं.. ही हृदयनाथ मंगेशकरांनी केलेली अशी अनेक गाणी या शतकात संगीत स्वरमुकुटातील रत्नांप्रमाणे झळकत आहेत. ती कधीही जुनी वाटत नाहीत हीच त्यांची दुर्मिळता. जसे नदीचे वाहते पाणी सदैव खळाळतं, निर्मळ असतं अगदी तसे हे दीनानाथी संगीत आहे. आज त्यांची १२३वी जयंती! या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि त्यांचे अजरामर संगीत सदैव ऐकत राहूया.
- विजयालक्ष्मी मणेरीकर ( ९८२२६८३७९९ )
(लेखिका गायिका, संगीत अभ्यासक आहेत.)