पालकमंत्रिपदासाठी रूसवे फुगवे का?
Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 14:04:44
पालकमंत्री म्हणजे एका जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो. जिल्हा विकास नियोजन समितीला मिळणाऱ्या निधीची विल्हेवाट लावण्याचा मक्ता (ठेका) पालकमंत्र्याकडे असतो. एक मंत्री पालकमंत्री बनला किंवा बनवला तर एका वर्षात कमीत कमी दोनशे कोटी कमवू शकतो, असे आजपर्यंतचे आकडे सांगतात.
जिल्हा विकास नियोजन समिती म्हणजे निधी वाटपाचे दुकान असते. हा निधी कामासाठी वापरा किंवा नका वापरू, कोणी विचारणार नाही. ही हमी पालकमंत्री घेतो. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे दर ठरलेले असतात. बिचाऱ्या करदाता आणि मतदात्यांना हे माहीत ही नसते. माझा कर कसा चोरी होतो? माझा आमदार कशी चोरी करतो?. या चोरीत पालकमंत्री जिल्ह्यातील सर्वंच आमदार-खासदारांना सहभागी करून घेतो. कलेक्टर हा या समितीचा सचिव असतो. त्याच्याच सहीने हा निधी ट्रेझरीमधून बाहेर पडतो. या चोरांना अडवणारा कलेक्टर अजून तरी कोणत्याही मातेने जन्माला घातला नाही. याच चोरांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त, स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाते. अनेक नागरिक ठेवणीतील कपडे इस्त्री करून घालून हजेरी लावतात. त्याबद्दल त्यांना एक चहा, चॉकलेट दिले जाते. जेणेकरून पालकमंत्र्यांचे भाषण संपताच टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवून आपण गब्बर सिंगला रामगड लुटण्यासाठी संमती प्रदान करतो. यात अधिकतम रिटायर्ड मिल्ट्रीमन असतात. त्यांना एक्स सर्व्हिसमन म्हणतात. तो चीन, पाकिस्तानमधील शत्रूला गोळी घालत होता, पण येथे फक्त टाळी वाजवतो. देशांतर्गत शत्रूला गोळी घालत नाही. तो ‘क्रांतिवीर’मधील राजकुमार किंवा नाना पाटेकरचा रोल करीत नाही. आता कळले.. पालकमंत्री बनण्यासाठी मंत्री का रूसवे फुगवे करीत आहेत?
महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो. स्वत:ला मराठा.. मराठा.. म्हणून मिरवतो, पण येथे मराठी बाणा हरवलेला दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे दहा वेळा नाव घेतात तर एकदा तरी त्यांच्यासारखा मराठी बाणा दाखवला पाहिजे. मला माझे साथीदार सांगतात, तुम्ही एखाद्या पक्षात जाऊन निवडणूक लढवली तरच विजयी होणार. मी म्हणतो, मी भारतातील कोणत्याही पक्षात जायला तयार आहे, पण मला कोणी घेत नाहीत. म्हणे तुम्ही आपल्याच पक्षातील आमदार- खासदार, मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्र्याला भ्रष्टाचार करू देणार नाहीत. कारण भ्रष्टाचार केल्याशिवाय कोणीच आमदार-खासदार, मंत्री, नगरसेवक निवडणूक लढत नाहीत. भ्रष्टाचार हाच तर राजकीय पक्षांचा मेन अजेंडा असतो. खात्री करण्यासाठी आमदार-खासदार, मंत्र्यांची संपत्ती मोजून पाहा. जळगाव जिल्ह्यातील एक राजकीय कार्यकर्ता व्हिडिओत म्हणाला होता की, जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पैशांचा पाऊस पडला होता. हा व्हिडिओ इंग्लंडमध्येसुद्धा पाहिला गेला, पण यातील पूर्ण सत्य हे आहे की, एकीकडे पैशांचा मुसळधार पाऊस होता, तर दुसरीकडे पैशांची झडी होती. नेते, कार्यकर्ते, मतदार यांत अक्षरश: न्हाऊन निघाले. काही तर वाहून गेले.
-शिवराम पाटील ( ९२७०९६३१२२ )