वाढती गुन्हेगारी अन्‌ हतबल पोलीस यंत्रणा

Written by लोकनामा ऑनलाईन स्टोरीज 2025-01-02 14:40:54

रोजच वर्तमानपत्र उघडले तर कुठेतरी हाणामारी, जीवघेणा हल्ला, खून, टोळी युद्ध असे प्रकार सहज घडत असल्याचे दिसते. काल-परवाची सिन्नर येथील हल्ल्याची बातमी वाचली आणि मन खिन्न झाले. यापूर्वी बीडमधील संतोष देशमुख याचा पोलीस कोठडीतील मृत्यू, अतिशय क्षुल्लक कारणावरून दोन गटांत वाद झाल्यानंतर पुढील रूपांतर जीवघेणा हल्ल्यात होते. वास्तविक गुन्ह्यातील आरोपी हे हिस्ट्रीशीटर आहेत, म्हणजेच पोलीस दरबारी वारंवार केलेल्या गुन्ह्यांची त्यांच्याविरुद्ध नोंद आहे. 
          दोन-चार गुन्हे करून आपले काही कोणी करू शकत नाही ही गुन्हेगारी क्षेत्रातील सराईतांची समजूत होते, त्यांचे राजकारण्यांशी असलेले घरोब्याचे संबंध, अनेक  सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूंच्या आमदारांनी सभागृहात निदर्शनास आणून देऊन ही त्या व्यक्ती सराईतपणे मुक्तपणे संचार करत आहेत. त्यासाठी त्यांना भक्कम राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे शक्य नाही. प्रकरण एकदम अंगाशी आले की, पुरावा नष्ट करण्यासाठी एन्काउंटर करून मोकळे व्हायचे हा सोपा मार्ग पकडायचा. वास्तविक सुरुवातीलाच गुन्हेगार मोकाट सुटले की, ते नवनवीन गुन्हे करतच राहतात. वास्तविक पहिल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी जरब बसवली तर तो आयुष्यात पुढे गुन्हा करण्याची हिंमत करणार नाही. 
पूर्वी क्वचित एखादी घटना घडत असे आणि पोलीस यंत्रणा व सामाजिक बांधिलकी यांतून गुन्हेगार सरळ होत असत. परंतु आता ना कायद्याचा किंवा पोलिसांचा धाक उरलेला नाही. काही घडले तर लगेचच जामिनासाठी यंत्रणा सज्ज असते. त्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित असते. पुन्हा तो बाहेर येऊन माझे कोणीच काही करू शकत नाही, अशा रूबाबात अशा व्यक्ती वावरत असतात. त्यामुळे सामान्य जनतापण घाबरून तटस्थ राहून याकडे बघत असतात.
          त्याच्याकडून काही गुन्हे झाल्यावर त्याचे सराईत असे नामाभिधान केले जाते. वास्तविक, पोलीस यंत्रणेला ही सर्व माहिती असूनही ते दुर्लक्ष करतात याबद्दल आश्चर्य वाटतं. सरावलेल्या अशा गुन्हेगारांना कमीत कमी पोलिसांचा तरी धाक असावा असे सर्वसामान्यांना वाटते. परंतु पोलिसच दुर्लक्ष करत असतील तर काही दिवसांनी ती व्यक्ती परिसराचा ‘भाई’ बनते. पूर्वीचा काळ आठवला तर त्याकाळी पोलिसांची खूप जरब होती. खाकी हाफ पॅन्ट, सायकल, एक काठी घेऊन पोलीस गावात वेशीबाहेर दिसला तर सर्व गाव चिडीचूप होत असे. परंतु आता गुन्हेगार पोलीस गळ्यात गळे घालून फिरतात. यावर उपाय म्हणजे सर्व हिस्ट्रीशीटरवर करडी नजर ठेवून तो दैनंदिन व्यवहारामध्ये काय करतो? कुठे उठबस करतो?, त्याच्या संपर्कात कोण आहेत? त्याच्या हालचालींवरून काही चुकीचे आढळून आल्यास त्याला प्रत्यक्ष बोलावून समज द्यावी, त्याला पोलिसी खाक्या दाखवावा, जेणेकरून यंत्रणेची त्याच्यावर जरब बसेल. पुढे काही घडल्यास तत्काळ कारवाई करावी. यासाठी स्वतंत्रपणे यंत्रणा कार्यान्वित करावी. त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हे झाल्यावर रेकॉर्ड करावे. पहिल्या गुन्ह्यामध्येच त्याला इतकी जरब असावी की, पुढे त्याच मत परिवर्तन झालेच पाहिजे. त्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता वाटल्यास तेपण करावे. त्याच्या भविष्यातील कौटुंबिक सामाजिक सलोख्यासाठी विचार परिवर्तन व्हावे, म्हणजेच भविष्यात तो तसे वागणार नाही आणि आपोआपच गुन्हेगारी कमी होईल. यासाठी शासनाने पुरेसे मनुष्यबळ, आधुनिक यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूदही करावी, आयटी क्षेत्रातील अभियंत्यांना सोबत घ्यावे आणि गुन्हेगारांपेक्षा सबळ माहिती तंत्रज्ञान यंत्रणा कार्यान्वित करावी, त्याची जाणीवपण गुन्हेगारांना झाली पाहिजे, तसा मेसेजपण गेला पाहिजे. भविष्यात होणाऱ्या अशा घटना टाळण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा.
- कुबेर जाधव ( ९४२३०७२१०२ ) 

(लेखक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक आहेत.)