पोलीस बंदोबस्तात यशवंत मंडई रिकामी करणार
मनपा करसंकलन विभागाची तयारी; गाळ्यांना ठोकणार ‘सील’
Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2025-01-02 15:16:59
लोकनामा प्रतिनिधी
नाशिक : रविवार कारंजावरील यशवंत मंडईची इमारत धोकेदायक स्थितीत असून, मनपाने नोटिसा बजावूनही तेथील व्यावसायिक गाळे सरेंडर करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे आता मनपा करसंकलन विभाग पोलीस प्रशासनाची मदत घेऊन, तेथील व्यावसायिकांना बाहेर काढून गाळे सील करणार आहे. आयुक्तांनी ग्रीन सिग्नल देताच या कारवाईचा श्रीगणेशा केला जाईल.
यशवंत मंडईची इमारत चाळीस वर्षे जुनी असून, मनपाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मनपा करसंकलन विभागाने गाळे रिकामे करा, अशा नोटिसा व्यावसायिकांना बजावल्या. त्याविरोधात व्यावसायिक न्यायालयात गेले. तेथेही त्यांना न्यायालयाने दणका दिला. त्यानंतर मनपाने गाळे रिकामे करण्याबाबत व्यावसायिकांना अंतिम नोटिसा बजावल्या. यशवंत मंडई खाली करून ती जमीनदोस्त केली जाणार आहे. परंतु नोटिसा देऊनही व्यावसायिक जुमानेसे झाले असून, गाळे रिकामे करण्यासाठी नकारघंटा वाजवत आहेत. त्यावर पर्याय म्हणून आता करसंकलन विभाग पोलीस बंदोबस्तात गाळे रिकामे करणार आहे. येथे बहुमजली पार्किंग अथवा व्यापारी संकुल उभारण्याचा मनपा प्रशासनाचा मानस आहे.
सात कोटी थकीत
सद्य:स्थितीत दहा ते बारा व्यावसायिकांनी अद्यापही गाळे खाली केलेले नसून त्यांच्याकडे भाड्यापोटी सात कोटींची थकबाकी आहे. थकबाकी अदा करण्यास नकार दिला तर त्यांच्या संपत्तीवर बोजा चढवला जाणार आहे.
आयुक्तांकडे मागितली परवानगी
आयुक्तांकडे पोलीस बंदोबस्तात यशवंत मंडई इमारत खाली करण्याची परवानगी मागितली आहे. ही इमारत धोकेदायक असून, ती कधीही कोसळू शकते.
- श्रीकांत पवार, उपायुक्त, विविध कर व परवाने विभाग, मनपा