बिबट्याच्या जबड्यातून मुलीची सुटका

लखमापूर शिवारातील आईची धिटाई; आठवर्षीय बालिका जखमी

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 2025-01-02 15:22:59

 राजेंद्र जाध‍व : लोकनामा 
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील शिंदे वस्तीत मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात आठवर्षीय बालिका गंभीर जखमी झाली. स्वत:चा जीव धोक्यात घालून धाडसाने आईने मृत्यूच्या जबड्यातून मुलीची सुटका केली. आईच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे. 
         गंभीर जखमी बालिकेला उपचारासाठी प्रारंभी नाशिक जिल्हा रुग्णालयात, त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केले असून, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले.   
          बालिका गुंजन शिंदे मंगळवारी सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर, ती द्राक्षबागेत काम करणाऱ्या आईकडे जात असताना, जवळच टोमॅटोच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला करत तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी मुलीची भयानक अवस्था पाहून आईने स्वत:चा जीव धोक्यात घालून हातातील विळा घेऊन बिबट्याकडे धाव घेतली. बिबट्याने जबड्यात पकडलेल्या गुंजनला सोडून देत उसाच्या शेताकडे पळ काढला. तथापि, या हल्ल्यात गुंजनच्या मानेला बिबट्याचे दोन दात लागून व मोठी जखम झाल्याने तिला प्राथमिक उपचारासाठी येथील दिघे हॉस्पिटलमध्ये, नंतर दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर गुंजनला जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.  गुंजनवरील बिबट्याच्या हल्ल्याने संताप व्यक्त होत असला, तरी आईने लेकीसाठी दाखवलेल्या धाडसाचे नागरिक कौतुकही करीत आहेत.
         दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर, गंभीर जखमी गुंजनला जिल्हा रुग्णालयात सरकारी रुग्णवाहिकेने घेऊन जात असताना, रुग्णवाहिका रस्त्यातच नादुरुस्त झाली. त्यामुळे उपचाराला विलंब होत असल्याने शेवटी गुंजनचे वडील बापू शिंदे यांनी खासगी वाहनातून तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमी बालिकेला सध्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून, बालिकेची प्रकृती आता ठीक असल्याची माहिती सहाय्यक वन संरक्षक संतोष सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील यांनी रुग्णालयात जात बलिकेच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर दिली. 
          बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी पिंजरा लावला असून, लखमापूर परिसरात यापूर्वीच तीन पिंजरे लावलेले असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. वन परिमंडळ अधिकारी आर. व्ही. तुंगार, वनरक्षक ए. एस. टेकनर, एच. डी. महाले, डी. ए. वाघ, वनमजूर परशराम भोये आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.