जिल्ह्यात नवीन दहा हजार नवमतदार

मतदारयादी पुनरीक्षण; सात लाख घरांत पोहोचले बीएलओ

Written by लोकनामा ऑनलाईन शहर 0000-00-00 00:00:00

नाशिक : मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रमानुसार घरोघरी जाऊन मतदारांची पडताळणी करण्याच्या मोहिमेत जिल्ह्यातील चार हजार बीएलओ सुमारे सात लाख मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचले असून, सुमारे दहा हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. 
केंद्रीय निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान मतदार यादीतील नोंदींच्या दुरुस्तीची कामे १५ विधानसभा मतदारसंघांत राबविण्यात आली. अंतिम मतदार यादीत ४६ लाख ३० हजार ३७५ मतदार समाविष्ट होते.
या मोहिमेतून मतदारांची एकूण संख्या ४६ लाख ४० हजार ७७७ इतकी झाली आहे. या मोहिमेत नवमतदारांची संख्या वाढविण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याने त्यादृष्टीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बीएलओंना सूचना दिल्या होत्या. निवडणूक आयुक्तांनी घेतलेल्या आढाव्यातदेखील नवमतदारांची नोंदणी वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सुचविल्याने त्यादृष्टीने प्रयत्न झाल्यामुळे जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या वाढली असल्याचे दिसून आले. या मोहिमेत बीएलओंना घरोघरी पोहोचण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते
मोहिमेत मतदार कार्डातील दुरुस्ती, नवमतदारांची नोंदणी, छायाचित्र, पत्ता बदल, नावांची दुरुस्ती असा व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. जिल्ह्यातील सुमारे चार हजार ७२० बीएलओंनी मतदारांच्या घराेघरी पोहोचण्याचे आदेश करण्यात आले होते. नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, मालेगाव बाह्य, नांदगाव, मालेगाव मध्य, नाशिक मध्य, देवळाली, बागलाण, कळवण, चांदवड, निफाड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी आणि येवला मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचून मतदान केंद्रस्तरीय कर्मचाऱ्यांनी नवमतदारांची नोंदणी केली. निवडणूक कर्मचाऱ्यांना घरोघरी भेट देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते.

 

 

निवडणूक उपजिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 

मोठ्या रहिवासी सहकारी संस्थांमध्ये बीएलओ कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार खात्याच्या माध्यमातून निवेदनदेखील केले होते. त्यानुसार, येणाऱ्या मतदार कर्मचाऱ्यांना इमारतीत प्रवेश मिळावा, तसेच मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात इमारतीतील रहिवाशांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे सात लाख १८ हजार ९४१ मतदारांपर्यंत मतदार कर्मचारी पोहोचले. या मोहिमेच्या अखेरच्या दिवशी झालेल्या कामाचा आढावा निवडणूक उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी घेतला. त्यानुसार नवमतदारांची संख्या दहा हजारांनी वाढली असल्याचे दिसून आले.