मुंबई - भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकच्या विधानाने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कार्तिक म्हणाला की, आगामी विश्वचषकात तुम्ही मला नक्कीच पाहाल.
विश्वचषक २०२३ चा सलामीचा सामना ५ ऑक्टोबर रोजी व अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. येत्या विश्वचषकात तो कॉमेंट्री करणार असल्याचे संकेत कार्तिकने दिले आहे.
३८ वर्षीय कार्तिकने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. त्याच्या चाहत्याने कार्तिकला टॅग करत विचारले की, विश्वचषकासाठी तुमच्या नजरेत विकेटकीपरसाठी २ पर्याय कोणते? तुम्हाला केएल राहुल, इशान किशन, संजू सॅमसनपैकी दोघांची निवड करावी लागेल. कार्तिकने उत्तर दिले, "मी इतकेच सांगेन की, तुम्ही मला विश्वचषकात नक्कीच पहाल.
तो त्याच्या कॉमेंट्रीमुळे खूप चर्चेत आला आहे. त्याने २ वेळा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कॉमेंट्री केली. विश्वचषकात ही पहिली वेळ असेल जेव्हा कार्तिक कॉमेंट्री करताना दिसणार आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज सध्या इंग्लंडमध्ये द हंड्रेडमध्ये कॉमेंट्री करत आहे.